चंद्रकांतदादांनी सुनावले; भाजपमध्ये बंडाची भाषा बंद करा 

चंद्रकांतदादांनी सुनावले; भाजपमध्ये बंडाची भाषा बंद करा 

सांगली - ""भाजपची उमेदवारी, नेत्याचे काम आणि पक्षाने केलेले सर्वेक्षण या आधारेच ठरवली जाते. जत आणि इस्लामपूर मतदारसंघातही तसेच होईल. त्यामुळे कुणी बंडाची भाषा करू नये,'' असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दोन्ही तालुक्‍यातील नेत्यांना सुनावले. 

मिरज येथील शासकीय निवासस्थानी सकाळी सात वाजता भाजपच्या नेत्यांसह संभाव्य बंडोबांनी चंद्रकांतदादांची भेट घेतली. जवळपास दोन तास बंद खोलीत त्यांनी वेगवेगळ्या गटांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे उपस्थित होते. 

जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलासराव जगताप यांनी आधी भेट घेऊन तेथील गटबाजी आणि पक्षांतर्गत बंडाविषयी कल्पना दिली. नेमके कुठे चुकले, कुणी काय डाव खेळले, याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर भाजपचे अन्य इच्छुक डॉ. रवींद्र आरळी, तम्मनगौडा, रवि पाटील, प्रकाश जमदाडे आदींनी भेट घेऊन जगताप यांना विरोधाची भूमिका घेतली. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, या मुद्याचा पुनरुच्चार केला.

त्यावर चंद्रकांतदादांनी त्यांना सुनावले. ""भाजपची उमेदवारी कुणी मागून मिळत नाही, त्यासाठी नेत्यांचे काम आणि पक्षाचा सर्वे महत्वाचा असतो. तेथील उमेदवार सर्वेच्या अहवालानुसार ठरेल, कुणी बंडाची भाषा करू नका, तसे वातावरणही नको,'' अशा शब्दांत समज दिली. 

इस्लामपूर मतदारसंघाविषयी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वैभव शिंदे, भिमराव माने, गौरव नायकवडी, राहुल महाडिक यांच्यासह मित्रपक्षातील काही नेत्यांनी चंद्रकांतदादांची भेट घेतली. हा गट नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा विरोधक मानला जातो. तेथेही सर्वे करून पुढील धोरण ठरवले जाईल, कुणीच घाई करू नका, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. उमेदवारी कुणालाही दिली तरी काम सर्वांनी एकजुटीने करावे लागेल, अशी समजही त्यांनी दिली. 

मनपा कारभारी भेटीला 
महापालिकेचे तीन कारभारीही चंद्रकांतदादांना भेटायला आले होते. माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आणि सुरेश आवटी यांनी भेट घेतली.

""महापालिकेच्या कारभाराविषयी सगळे अहवाल माझ्याकडे आहेत. गडबड नको, नीट काम करा. महापालिकेच्या पलिकडेही पक्षाचे राजकारण आहे, त्यात लक्ष घाला,'' अशा सूचना चंद्रकांतदादांनी दिल्या.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com