
Sangli Congress : ‘माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे तळागाळातील माणसाला केंद्रस्थानी ठेवून विकासाचे राजकारण करायचे. त्यांच्या घराण्याची संस्कृती भाजपच्या विचारांशी मिळतीजुळती आहे. वसंतदादा घराण्यातील व्यक्ती आमच्या पक्षात नाही, याचे शल्य होते. जयश्रीताईंच्या भाजप प्रवेशानंतर ते राहणार नाही’, असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर आज शिक्कामोर्तब केले. बुधवारी (ता. १८) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश होईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
पालकमंत्री पाटील यांनी आज वसंत कॉलनीतील विजय बंगल्यात जयश्री पाटील यांची भेट घेत प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक चर्चा केली. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी उपमहापौर शेखर इनामदार, जनसुराज्यचे समित कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सी. बी. पाटील यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.