सेनेची तुम्हाला एवढी काळजी का?; चंद्रकांतदादांचा मुश्रीफांना सवाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

कोल्हापूर - चंद्रकांतदादा, तुम्ही तिकडे (मुंबई) असताना आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यात नेमकी तांत्रिक अडचण काय झाली, अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ यांनी करताच शिवसेनेची एवढी काळजी तुम्ही का करता? असा प्रतिप्रश्‍न करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत चांगलीच रंगत आणली. 

कोल्हापूर - चंद्रकांतदादा, तुम्ही तिकडे (मुंबई) असताना आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यात नेमकी तांत्रिक अडचण काय झाली, अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ यांनी करताच शिवसेनेची एवढी काळजी तुम्ही का करता? असा प्रतिप्रश्‍न करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत चांगलीच रंगत आणली. 

ज्यांना माहिती हवी, त्यांना ‘मातोश्री’चा नंबर द्या, अशी सूचनाही पाटील यांनी केली. नेमकी अडचण काय झाली हे ट्रेनमध्ये भेटू, त्यावेळी बोलू, असे सांगताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले. अन्य एका प्रश्‍नावर तुम्ही आणि मी बसून बोलूया. तुम्ही आधी इकडे या, असे आवाहन पालकमंत्र्यांनी करताच मुश्रीफ यांनी मी तिकडे आलो तर तुम्ही ज्यांना घेतले, त्यांची अडचण होईल, असे सांगताच सभागृहाची राजकीय उत्सुकता आणखी वाढली.

चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी सव्वातीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बैठकीस सुरवात झाली. नावीन्यपूर्ण योजनेतील निधी अपेक्षेप्रमाणे खर्च होत नाही. शासकीय अधिकारी पैसे वाटून घेतात. आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांवर सोलर यंत्रणा लावून घ्या. दवाखान्यांना गरम पाणी मिळू द्या, असे मुश्रीफ यांनी सांगताच पालकमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत तुम्ही आणि आम्ही बसून बोलूया.

तुम्ही आधी आमच्याकडे या, असे पालकमंत्र्यांनी सांगताच मुश्रीफ यांनी आम्ही तिकडे आलो तर तुम्ही ज्यांना घेतले, त्यांची अडचण होईल, असे उत्तर दिले. नेमके याचवेळी व्यासपीठावर ‘म्हाडा’ (पुणे) अध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित होते.

बैठकीच्या समारोपाला मुश्रीफ यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण येथे आलो होतो. पूर्वी बाबासाहेब कुपेकर यांनी नियोजन मंडळाचा कार्यभार सांभाळला आहे. मी ही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. क्षीरसागर यांनी मंत्री होण्यात तांत्रिक अडचण झाल्याचे म्हटले आहे. 

आपण तिथे असताना नेमकी तांत्रिक अडचण काय झाली, याची विचारणा मुश्रीफ यांनी करताच पालकमंत्र्यांनी तुम्ही एवढी शिवसेनेची काळजी का करता? असे सांगून, ज्यांना तांत्रिक अडचणीची माहिती हवी आहे, त्यांना ‘मातोश्री’चा नंबर द्या, अशी सूचना करून तुम्ही आणि मी ट्रेनमध्ये एकत्र आल्यानंतर तांत्रिक अडचण काय होती ते सांगतो, असे पालकमंत्र्यांनी सांगताच सभागृहाचा नूर पालटून गेला.प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने या दोन्ही खासदारांची ही पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Chandrakant Patil question on Hasan Mushrif comment