ग्रामस्थांना न भेटताच मंत्री माघारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

सांगली - पंकजा मुंडे या राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री आहेत, तर सुभाष देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी भ्रूणहत्येसारख्या गंभीर प्रकरणात घटनास्थळी भेट देणे आवश्‍यक होते. विधिमंडळाच्या अधिवेशनाला शनिवारी सुटी असल्याने हे दोन्ही मंत्री म्हैसाळ येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधतील आणि नंतर आढावा बैठक घेतील, अशी अपेक्षा होती; मात्र म्हैसाळकडे पाठ फिरवून केवळ अधिकाऱ्यांची आज बैठक घेऊन या मंत्र्यांनी तपासाचा आढावा घेतला.

आढावा बैठकीनंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी, तसेच सांगली, मिरजेच्या आमदारांच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. माधवनगरमधील एका व्यापाऱ्याच्या घरीही त्यांनी भेट दिली. मग म्हैसाळला का नाही? याबद्दल येथे चर्चा सुरू होती. बैठकीत या प्रकरणातील तपास अधिकारी उपअधीक्षक धीरज पाटील यांना तडकाफडकी हटवून त्यांच्या जागी सांगलीच्या उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची नियुक्ती करण्यात आली. अचानकपणे घेतलेल्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे; मात्र याची जबाबदारी ज्या समितीवर आहे, त्या समितीबाबत व आरोग्य अधिकाऱ्यांबाबत कोणतेही भाष्य मंत्र्यांनी केले नाही. उलट पोलिसांनी याचा तपास नेटक्‍या पद्धतीने केला आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. या वेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, 'म्हैसाळची घटना समाजाची मानसिकता बिघडवणारी असून, दु:खदायक व खेदजनक आहे. या प्रकरणात काहींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये सविस्तर चौकशी केली जाईल. अधिकाऱ्यांकडून हेळसांड झाली झाली असेल, तर दोषी अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल.'' डॉक्‍टर असलेल्या महिला पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांची या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नव्या अधिकाऱ्यांमुळे तपास आणखी गतीने होईल.''

आढावा बैठकीत पदाधिकारीही
म्हैसाळमधील स्त्रीभ्रूणहत्येप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत मंत्री, खासदार, आमदार, गृह खात्याचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते; मात्र या शासकीय बैठकीला भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Minister returned to the villagers not meeting