कोल्हापूरच्या पुररेषेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही - महाजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - आठ दिवसांपूर्वी पुररेषेबाबत कोल्हापूरचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आले होते. त्यांनी काही गोष्टी सुचविल्या होत्या. पुर रेषेमधील काही गोष्टी नियमित करण्याबाबत आग्रह धरला होता. मात्र त्याचे दुष्परिणाम आत्ताच्या पुरात दिसून आले आहेत. त्यामुळे शहराच्या पुर रेषेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिला. 

कोल्हापूर - कोल्हापूरची पूररेषा निश्‍चिती केली जाणार आहे. काही गोष्टी नियमित करण्याचा आग्रह काही जणांनी धरला होता; मात्र त्याचे दुष्परिणाम लगलेच निदर्शनास आले. कोल्हापूरची जनता वेठीस धरण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यामुळे कोल्हापूरची पूररेषा निश्‍चित करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही. येथील भौगोलिक परिस्थिती, कायदे आणि नियमांच्या चौकटीतच पूररेषेची निश्‍चिती केली जाईल, अशी स्पष्टोक्ती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केली. त्यांनी शहरातील पूरस्थितीचा आढावा प्रत्यक्ष पुराच्या ठिकाणी जाऊन घेतला. त्यानंतर ते बोलत होते. 

कोल्हापूर शहर "न भूतो- न भविष्यती' असा महापूर यंदा अनुभवत आहे. शहरातील खानविलकर पेट्रोलपंपाच्या मागे, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, न्यू पॅलेसच्या मागची बाजू, बापट कॅम्प परिसर, जाधववाडी, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसले आहे. ज्या ठिकाणी पुराचे पाणी येईल अशी कल्पनाही कधी कोणी केली नव्हती, त्या भागात पुराचे पाणी आले. त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा पंचगंगा नदीच्या पूररेषेचा विषय चर्चेत आला. मात्र, या चर्चेला सुरवात 15 दिवसांपासून झाली होती. कोल्हापुरातील एक शिष्टमंडळ मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना पूररेषा निश्‍चितीबाबत भेटले होते. या पार्श्‍वभूमीवर जलसंपदामंत्री महाजन पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरात आले होते. महावीर महाविद्यालय येथे त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बचाव कार्याची पाहणी केली. 

या वेळी पूररेषेबाबत श्री. महाजन म्हणाले, ""नदीची पूररेषा निश्‍चिती खूप गांभीर्याचा विषय आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापुरातील एक शिष्टमंडळ मुंबईत पूररेषा निश्‍चितीबाबत निवेदन देण्यासाठी आले होते. यात त्यांनी काही बाबी नियमित करण्याचा आग्रह धरला होता; पण त्याचे दुष्परिणाम काय होतात, हे आठ दिवसांतच दिसून आले. पूररेषेची निश्‍चिती करताना भौगोलिक परिस्थिती, नदीचे मोठे पूर याचा आढावा घेतला जाईल. पूररेषेबाबतचे नियम, कायदे यांच्या चौकटीतच पूररेषेशी निश्‍चिती केली जाईल. पूररेषा निश्‍चितीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.''

या वेळी त्यांच्याबरोबर विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे होते. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of Water Resources Girish Mahajan comment