‘महाविकास’मधील अनेक मंत्री भ्रष्टाचारी;पंकजा मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पंकजा मुंडे

‘महाविकास’मधील अनेक मंत्री भ्रष्टाचारी;पंकजा मुंडे

सांगली: राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांच्यावर गंभीर आरोप झाले, कारवाई झाली, तरीही त्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत, हे धक्कादायक आहे, असा हल्लाबोल भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारताचा जसा नारा दिला, त्याचपद्धतीने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस मजबूत असणे गरजेचे आहे’, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मत मांडले होते. त्यांची ती भूमिका असली तरी आमच्या पक्षात विरोधाभास नाही, असा खुलासा पंकजा मुंडे यावेळी केला.

सांगली जिल्ह्याच्या भाजप प्रभारीपदी मुंडे यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच त्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले व प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. मुंडे म्हणाल्या, ‘आम्ही नरेंद्र मोदींच्या धोरणानुसार चालत आहोत. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ भाजपचेच अस्तित्व दिसेल, यासाठी काम करायचे आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. याठिकाणी पक्ष मजबूत आहेच, मात्र ज्याठिकाणी काही कमतरता जाणवेल त्याठिकाणी आवश्यकतेनुसार राजकीय ‘व्हिटॅमिन’ देण्याचा प्रयत्न करू. गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले. त्याचपद्धतीचे राजकारण मला करायचे आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत त्यांनी जोडलेली असंख्य माणसे आहेत. त्यामुळे मला येथे चांगले काम करता येईल.’’

राज्यातील कारभार सध्या अत्यंत वाईट पद्धतीने सुरू आहे. मंत्रिमंडळातील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे कारवाई झाल्यानंतरही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारविषयी शंका आहे. ईडीसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. या यंत्रणांच्या कारवाईविरोधात अनेकजण न्यायालयात गेले आहेत. न्यायालयांचे निकाल तर सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ असल्यचे मुंडे म्हणाल्या.राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

नाईकांबद्दल आदरच

शिराळा मतदारसंघातील नेते शिवाजीराव नाईक यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘त्यांच्या पक्ष सोडून जाण्याने पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे.’’

Web Title: Ministers Mahavikas Corrupt Pankaja Munde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top