मिरज ः संरक्षण साधनांअभावी बेवारस मृतदेहांची हेळसांड 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

संरक्षण साधने नसल्याने आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिल्याने शहरात दोन ठिकाणी मृतदेह उचलण्यास काही तास उशीर झाला. 

मिरज (सांगली) ः शहर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने पोलिसांना संरक्षण साधने देण्याबाबत चर्चा सुरू झाली. निव्वळ संरक्षण साधने नसल्याने आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिल्याने शहरात दोन ठिकाणी मृतदेह उचलण्यास काही तास उशीर झाला. 

एक नातेवाइकांनीच उचलून नेला. ब्राह्मणपुरीत मात्र सायंकाळी पोलिसांनीच संरक्षण साधने नसताना मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागरात नेऊन ठेवला. ब्राह्मणपुरीतील ही मृत व्यक्ती काही तास रस्त्यावर तडफडत होती. तिने मद्यप्राशन केले होते. हात कोणी लावायचा, यातच कित्येक तास ती तेथेच तडफडत होती. पोलिसांनी रात्री उशिरा तिला शासकीय रुग्णालयात नेले. तेथे ती मृत झाल्याचे स्पष्ट झाले. 

काल दुपारी मंगळवार पेठेतील एका दारू दुकानाशेजारी एकजण मृतावस्थेत पडल्याची माहिती घेऊन काही तरुण नगरसेवक निरंजन आवटी यांच्याकडे आले. आवटी यांनी तातडीने तरुणांना "पोलिसांना कळवा' अशा सूचना दिल्या. स्वतःही पोलिसांना कळवले. महापालिकेची शववाहिका आणि पोलिस या दोघांकडे सुरक्षा साधने नसल्याचा वाईट अनुभव मंगळवार पेठेतील मृताच्या नातेवाईकांना आला. ब्राह्मणपुरीत एका मंगल कार्यालयाशेजारील अपार्टमेंटसमोर एक व्यक्ती तडफडत पडल्याचे नागरिकांनी पाहिले. 

तेथे ओंकार शुक्‍ल यांनी येऊन विचारपूस केली. ती व्यक्ती पाणी मागत होती. खूपच मद्यप्राशन केल्याने धड बोलता येत नव्हते. तरीही ती पाण्यासाठी तडफडत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. दुपारी चारनंतर त्याची हालचाल थांबली. नंतर पोलिस व महापालिकेस कळविण्यात आले. शववाहिका घेऊन आलेल्या पोलिसाच्या हातात मोजेही नव्हते. तरीही त्यांनी शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी करून घेतली असता बेवारस मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तो मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला. 

 संपादन ः प्रमोद जेरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj: careless corpses due to lack of protection