बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचा मिरजेत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

मिरज - सनईच्या सुरांनी सारे घर न्हाऊन निघाले, लग्नासाठी घरातून कार्यालयात जाण्याची गडबड सुरू होती. मित्रमंडळी लग्नाच्या ठिकाणी जाण्यासाठी गडबड करीत होती. कोल्हापूरहून निघालेली वधूची गाडी मिरजेजवळ आली. ११ वाजून ४६ मिनिटांनी रवींद्र लग्नाच्या बेडीत अडकणार होता; पण केवळ काही मिनिटांत नियतीने सगळ्या रंगाचा बेरंग केला. बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या रवींद्रला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मोठ्या रुग्णालयात नेतानाच दुसरा झटका आला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

सनईचा सूर थबकला, हळद काळवंडली, मिनिटभरापूर्वी आनंदाने बहरलेला दारातील मांडव दुःखात बुडाला. तानाजी चौकाचा परिसर सुन्न झाला. दारातला प्रत्येक जम निःशब्द झाला. जिथून रवींद्रची वरात निघणार होती तेथून त्याची अंत्ययात्रा निघाली. रवींद्र मदन पिसे (वय २८) याच्याबाबत नियतीने हा खेळ खेळला.

मिरजेतील शिवाजी पुतळा परिसरात तानाजी चौकात मदन पांडुरंग पिसे कपडे शिवणारे पारंपरिक व्यावसायिक. पती-पत्नी आणि मुलगा, मुलगी असे चौकोनी कुटुंब. मुलगा रवींद्र एका खासगी बॅंकेत नोकरीला लागला. नोकरी चांगली असल्याने त्याचे लवकरात लवकर दोनाचे चार हात होण्यासाठी सोयरिक जुळवली. सगळे ठरले. लग्नाचा मुहूर्त आज सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांचा. पिसे कुटुंबाचा मोठा संपर्क आणि मुलाचा मित्रपरिवार यांच्या सोयीसाठी टाकळी रस्त्यावरील कार्यालय ठरविण्यात आले.

काल (ता. ११) सायंकाळी हळदीचा कार्यक्रम झाला. आज सकाळपासून रवींद्र मित्र व नातेवाइकांच्या हास्यविनोदात बोहल्यावर चढण्यासाठीची तयारी करीत होता. दारात मित्रांनी सजवलेली मोटार आली. अंघोळ करून देवाला, आई-वडिलांना नमस्कार करून तो गाडीत बसून लग्नाच्या हॉलकडे जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला चक्कर आली. तातडीने त्याला शेजारच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी मोठ्या डॉक्‍टरांकडे नेण्यास सांगितले. मोठ्या डॉक्‍टरांकडे नेतानाच रवींद्रला हृदयविकाराचा दुसरा मोठा झटका आला आणि सगळा खेळ संपला. रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. वऱ्हाडी म्हणून आलेल्या नातेवाइकांच्या उपस्थितीत त्याचा अंत्यविधी निघाला. 

आई-वडिलांचा शोक पाहून शिवाजी पुतळ्याचा परिसर सुन्न झाला.

Web Title: miraj news bridegroom death by heart attack