मिरज मेडिकलच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय शाबासकी

संतोष भिसे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मिरज - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी असणाऱ्या शुभम हिरेमठने महाविद्यालयाचा एक उपक्रम म्हणून डॉक्‍युमेंट्री तयार केली. तिची दखल थेट स्वित्झर्लंडच्या पथकाला घ्यावीशी वाटली. आंतरराष्ट्रीय परिषदांत दाखवण्यासाठी तिचा विचार झाला. 

मिरज - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी असणाऱ्या शुभम हिरेमठने महाविद्यालयाचा एक उपक्रम म्हणून डॉक्‍युमेंट्री तयार केली. तिची दखल थेट स्वित्झर्लंडच्या पथकाला घ्यावीशी वाटली. आंतरराष्ट्रीय परिषदांत दाखवण्यासाठी तिचा विचार झाला. 

अर्थात या डॉक्‍युमेंट्रीचे हिरोदेखील तितकेचे दमदार होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गेल्या महिन्यात मिरजेत निरंतर वैद्यकीय कार्यशाळा झाली. प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक प्रकाश आमटे आणि मंदा आमटे उपस्थित होते. या दोहोंना मिरजेत आणण्यापूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे पथक आनंदवनला गेले होते. तेथे त्यांनी आनंदवनाचा अभ्यास केला. आनंदवन अनुभवले. प्रकाश आणि मंदा आमटे यांच्याविषयी डॉक्‍युमेंट्री तयार केली. मिरजेतील कार्यशाळेत तिचे सादरीकरण करायचे होते. 

आमटे कुटुंबीयांवर आजवर अनेक डॉक्‍युमेंट्री आणि काही चित्रपट तयार झाले. त्यामुळे आपल्या डॉक्‍युमेंट्रीमध्ये वेगळेपणा असायलाच हवा याकडे चमूचे लक्ष होते. आमटे दांपत्याचा संपूर्ण जीवनपट अवघ्या दहा मिनिटांच्या चित्रफितीत मांडणे सहजसोपे नव्हते. शुभम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एखाद्या परिपूर्ण व कसलेल्या दिग्दर्शकाप्रमाणे चित्रफीत तयार केली. पार्श्‍वसंगीत, प्रकाशयोजना, मुलाखती, स्थिरचित्रांचा समावेश आदी बाबींच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले. 

आमटे दांपत्य आनंदवनाला परतले तेव्हा, तेथे स्वित्झर्लंडची एक टीम तेथे डॉक्‍युमेंट्री बनवण्यासाठी आली होती. महाबलीपुरम आणि तिरुवअंनतपुरम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ती दाखवायची होती. आमटे दांपत्याने त्यांना मिरजेतील विद्यार्थ्यांच्या डॉक्‍युमेंट्रीची शिफारस केली. त्यानुसार स्वित्झर्लंडच्या पथकाने शुभमशी संपर्क केला. डॉक्‍युमेंट्री मागवून घेतली. ती त्यांना भावली. परिषदेत दाखवण्याची तयारी दर्शवली. यानिमित्ताने मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय शाबासकी मिळाली. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी शुभम आणि त्याच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

आमटे दांपत्य स्तिमित
बालगंधर्व नाट्यगृहात कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी ती प्रसारित झाली. आमटे दांपत्याने प्रेक्षकांत बसून ती पाहिली. आपलाच जीवनपट नव्याने पाहताना तेदेखील स्तिमित झाले. शुभम आणि त्याच्या टीमच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवला.

Web Title: miraj news medical college