"म्हैसाळ' योजनेतून उपसा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मिरज - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंप आज सुरू झाले. दुपारी दोनला म्हैसाळ येथे पहिल्या पंपगृहातील दोन पंप कार्यान्वित करण्यात आले. सायंकाळी सहाला पाणी नरवाडमध्ये दुसऱ्या पंपगृहापर्यंत पोचले. पाणी पुढे सरकेल, त्याप्रमाणे सुरू करण्यात येणाऱ्या पंपांची संख्या वाढवली जाईल, असे सांगण्यात आले. 

मिरज - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंप आज सुरू झाले. दुपारी दोनला म्हैसाळ येथे पहिल्या पंपगृहातील दोन पंप कार्यान्वित करण्यात आले. सायंकाळी सहाला पाणी नरवाडमध्ये दुसऱ्या पंपगृहापर्यंत पोचले. पाणी पुढे सरकेल, त्याप्रमाणे सुरू करण्यात येणाऱ्या पंपांची संख्या वाढवली जाईल, असे सांगण्यात आले. 

यंदा पावसाने दडी मारल्याने म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात दिले. त्यानंतर कृष्णा कोरे महामंडळ आणि "महावितरण'च्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या. गुरुवारी (ता. 17) रात्री वीज जोडण्यात आली. बॅटरी चार्जिंग व पंपांच्या चाचण्या आदी विद्युत व यांत्रिकी कामांसाठी दोन दिवस गेले. काल (ता. 19) रात्रीच उपसा सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, बॅटरी चार्जिंगला वेळ लागल्याने उपसा सुरू व्हायला आजचा दिवस उजाडला. आज दुपारी दोनला यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते बटण दाबण्यात आले. कोणीही वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय नेता उपस्थित नव्हता. 

सुरवातीला दोन पंप सुरू करण्यात आले. दुपारी दुसऱ्या टप्प्याच्या संतुलन तलावात पाणी पोचल्यानंतर तेथे दोन पंप कार्यान्वित करण्यात आले. रात्री उशिरा पाणी तिसऱ्या टप्प्यात बेडगमध्ये पोचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पंपांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. कृष्णा नदीत पुरेसे पाणी असल्याने प्रकल्पासाठी पाणी कमी पडणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कालपासून तालुक्‍यात पावसाची रिपरिप सुरू झाली असली, तरी टंचाई दूर होण्याइतपत पाऊस झालेला नाही. त्यामुळे म्हैसाळ प्रकल्पाच्या पाण्याची आवश्‍यकता कायम आहे. उपसा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

जितके क्षेत्र, तितके पाणी 
गेल्या आवर्तनात पाणीवाटपावरून बराच गदारोळ झाला. आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्‍यावर पाणीवाटपात अन्याय केला जात असल्याचा आरोप केला होता. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली होती. त्यामुळे या आवर्तनात पाणीवाटपासाठी निश्‍चित सूत्र राबविण्याचा विचार सुरू आहे. ज्या तालुक्‍याचे जितके क्षेत्र तितका पाणीपुरवठा असे नियोजन सुरू आहे. म्हैसाळ योजनेचे लाभक्षेत्र 81 हजार हेक्‍टर आहे. मिरज तालुक्‍याचे लाभक्षेत्र 37 टक्के, जत तालुक्‍याचे 31 टक्के आणि तासगाव तालुक्‍याचे चार टक्के क्षेत्र आहे. तितकेच पाणी या तालुक्‍यांना मिळण्याची शक्‍यता आहे. त्यातून पाणीवाटपात दुजाभाव केल्याची तक्रार राहणार नाही, अशी अपेक्षा आहे.

Web Title: miraj news Mhaisal water