निलजी-बामणी दरम्‍यान पूल पावसाने गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मिरज - काल रात्री झालेल्या धुवाँधार पावसाने निलजी-बामणीदरम्यानचा पूल वाहून गेला. त्यामुळे बामणी गावचा संपर्क तुटला. सरपंच नितीन कोलप आणि सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची भेट घेऊन कार्यवाहीची मागणी केली. 

मिरज - काल रात्री झालेल्या धुवाँधार पावसाने निलजी-बामणीदरम्यानचा पूल वाहून गेला. त्यामुळे बामणी गावचा संपर्क तुटला. सरपंच नितीन कोलप आणि सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची भेट घेऊन कार्यवाहीची मागणी केली. 

बामणीकरांना सांगली व मिरजेला संपर्कासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. वाहने ओढ्याच्या एका काठावर ठेवून गावात पायी चालत जावे लागते. पाच वर्षांपासून बामणीचे ग्रामस्थ पुलासाठी संघर्ष करत आहेत. शासनाने नाबार्डमधून ३ कोटी २८ लाखांचा पूल मंजूर केला. गतवर्षी त्याचे कामही सुरू झाले. सध्या सात-आठ महिन्यांपासून ते बंद आहे. पैसे मिळाले नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला; परंतु दखल घेतली नाही. नवा पूल बांधण्यासाठी ठेकेदाराने जुना पूल पाडला. वाहतुकीसाठी शेजारी पर्यायी रस्ता तयार केला. त्यावर कच्चा पूल बांधला. काल रात्रीच्या पावसात तो वाहून गेला. मध्यरात्री सुमारे दोन तास या परिसरात धुवाँधार पाऊस झाला. पहाटेपर्यंत तो कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. सकाळी ग्रामस्थ गावाबाहेर आले, तेव्हा पूल वाहून गेल्याचे दिसले. 

सरपंच कोलप म्हणाले, ग्रामस्थांचा शहरांशी संपर्क तुटला आहे. नव्याने बांधकाम सुरू असलेला पूल त्वरित पूर्ण करावा यासाठी पाठपुरावा करत आहोत. सार्वजनिक बांधकामच्या हलगर्जीपणाचा त्रास ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. यंदा पाऊस नसतानाही अशी अवस्था झाली. उपजिल्हाधिकाऱ्यांना निवदन देतेवेळी जब्बार पटेल, खोनमीर पटेल, विजय मलमे, अतुल मलमे, जितेंद्र कोलप आदी उपस्थित होते.

Web Title: miraj news rain bridge