रा. स्व. संघाच्या संचलनावर मुस्लिमांकडून फुलांची उधळण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

मिरज शहरात हिंदू-मुस्लिम एकत्र येऊनच अनेक सण करतात. मिरासाहेब दर्ग्याचा उरुस किंवा मोहरमसारख्या सणात हिंदूची संख्याच मोठी असते. यास्थितीत दोन्ही धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहावेत हा हेतू आहे. मिरासाहेबांच्या साक्षीने हिंदू-मुस्लिम सलोख्याचा सेतू बांधण्याचा प्रयत्न आम्ही केला

मिरज - दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या संचलनाचे मुस्लिम बांधवांनी फुलांच्या वर्षावात स्वागत केले. मिरासाहेब दर्ग्याच्या प्रांगणात हिंदू-मुस्लिम बंधुतेचा सेतू निर्माण केला. शहरात अनेक वर्षांपासून संचलन होते. मात्र मुस्लिमांनी स्वागत करण्याचा प्रसंग प्रथमच घडला. 

स्वयंसेवक संघाने शहरात दसऱ्यानिमित्त संचलन केले. शंभराहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले. जवाहर चौक, मटण मार्केट जवळून संचलन मिरासाहेब दर्ग्यापुढे आले. तेथे नगारखाना कमानीत शंभरावर मुस्लिमधर्मीय एकत्र आले. त्यांनी स्वयंसेवकांवर गुलाब पाकळयांचा वर्षाव केला. स्वयंसेवक कमानीतून बाहेर पडेपर्यंत तो सुरु होता. प्रत्येक स्वयंसेवक फुलांच्या उधळणीत नाहला. नंतर संचलन माळी गल्लीत आले. 
मुस्लिमधर्मियांकडून झालेले स्वागत स्वयंसेवकांसाठी अनपेक्षित होते. मिरजेत काही वर्षांत घडलेल्या धार्मिक विद्वेषाच्या घटना पाहता शहरवासीयांसाठीही हा सुखद अनुभव ठरला. 

मिरज शहर मुस्लिम जमातीच्यावतीने असगर शरीकमसलत यांनी सांगितले, की शहरात हिंदू-मुस्लिम समभाव निर्माण व्हावा यासाठी आम्ही पुढाकार घेतला. काही वर्षांत संचलनादरम्यान मुस्लिमधर्मियांकडून काही अनुचित प्रकार घडले. त्यामुळे निर्माण झालेली तेढ पुसली जावी असाही हेतू होता. 

आज सुमारे शंभर मुस्लिम बांधव स्वागतासाठी हजर होते. पुढीलवर्षी ही संख्या नक्की वाढेल. मिरज शहरात हिंदू-मुस्लिम एकत्र येऊनच अनेक सण करतात. मिरासाहेब दर्ग्याचा उरुस किंवा मोहरमसारख्या सणात हिंदूची संख्याच मोठी असते. यास्थितीत दोन्ही धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहावेत हा हेतू आहे. मिरासाहेबांच्या साक्षीने हिंदू-मुस्लिम सलोख्याचा सेतू बांधण्याचा प्रयत्न आम्ही केला.'' 

शरीकमसलत यांच्यासह रफिक मुल्ला, मेहबुबअली मणेर, शमशुद्दीन मुतवल्ली, सैद मुतवल्ली, फैय्याज पठाण, नजीर मुतवल्ली, नजीर झारी, जमीर नालबंद, नासीर सय्यद, मुजीब मुतवल्ली आदी संचलनाच्या स्वागतासाठी उपस्थित होते. 
दरम्यान, दर्गा कमानीतून पुढे निघालेल्या संचलनाचा समारोप माळी गल्लीतून नदीवेस, पाटील गल्ली, वखारभाग यामार्गे परत मिरज हायस्कुलमध्ये झाला.

Web Title: miraj news: rss muslim