शेतकऱ्यांना लागला पाणी साठवण्याचा नाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

करोली (एम) मध्ये तीन वर्षांमध्ये 200 तळी
मिरज - मिरज तालुक्‍याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या करोली (एम) ची पाच वर्षांपूर्वीची कहाणी विदारक होती. उन्हाळा गावकऱ्यांची सत्त्वपरीक्षा पाहायचा. टंचाईमुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी यायचे.

करोली (एम) मध्ये तीन वर्षांमध्ये 200 तळी
मिरज - मिरज तालुक्‍याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या करोली (एम) ची पाच वर्षांपूर्वीची कहाणी विदारक होती. उन्हाळा गावकऱ्यांची सत्त्वपरीक्षा पाहायचा. टंचाईमुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी यायचे.

बागा जगवण्यासाठी घरातील दागिने, किडुकमिडुक विकून टॅंकर आणावे लागत. याच हजारावर शेतकरी असलेल्या गावाने तीन वर्षांत दोनशेहून अधिक शेततळी खोदली. चार शेतकऱ्यांमागे एक शेततळे, असा थक्क करणारा कायापालट झाला आहे. करोली शेततळ्यांचे गाव झाले.

शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांपैकी शेततळे सर्वाधिक यशस्वी ठरली आहे. त्याचे प्रत्यंतर करोली ( एम ) मध्ये येते. द्राक्षशेतीत विक्रमी कामगिरी करणाऱ्या सोनी, भोसे, पाटगाव आणि मणेराजुरीच्या पंगतीत करोली (एम) आहे. द्राक्षबागायतीचे घरोघरी वेड आहे. पाण्याचे दुर्भिक्ष पाचवीला पुजलेले. बागेतून मिळणारा अर्ध्यावर पैसा दीड-दोन महिने पाण्यासाठी खर्ची पडायचा. बागा जगतील याचा भरवसा नसे. त्यावर शेततळ्यांचा मार्ग सापडला आणि दुष्काळावरचा जालीम उपाय.

दोनशेवर शेततळ्यांचे जाळे विणले गेले आहे. बहुतांश द्राक्षबागा शेततळ्यांवर फुलल्यात. शंभर टक्के ठिबक सिंचन आहे. पाण्याचे महत्त्व जाणलेल्या करोलीकरांनी थेंब न्‌ थेंब पाणी वापरण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.

कृषी विभागाने "मागेल त्याला शेततळे', "राष्ट्रीय फलोत्पादन अभियान' आणि "राष्ट्रीय कृषी विकास योजना' या योजनांतून शेततळी देऊ केली. दीडशे शेततळी झाली. ऐंशी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वैयक्तिक शेततळी घेतलीत. शासन, शेतकऱ्यांनी सव्वाकोटी गुंतवलेत. तब्बल 22 लाख लिटर पाण्याचा साठा झाला आहे. चार-पाच महिने हमखास पाणी मिळते. द्राक्षबागायतीला दिलासा मिळाला. यापूर्वी उन्हाळ्यात टॅंकरसाठी लाखोंचा चुराडा व्हायचा. आता शंभर टक्के टॅंकरमुक्ती झाली.

चारा, मका, दूध उत्पादनातही वाढ
द्राक्षशेतीचे क्षेत्र 115 हेक्‍टर झाले. दरवर्षी तीन हजार टन द्राक्षउत्पादन होऊ लागले. शेततळ्यांमुळे मिळालेले यश पाहून शेततळी उभारणी सुरूच आहे. जणू शेततळ्यांचे वेड लागले आहे. गॅरंटीच्या पाण्याने चारा, मका, दुग्धोत्पादनातही वाढ झाली आहे.

Web Title: miraj news water storage by farmer