मिरज तालुक्‍यात विहीरखोदाईवर अघोषित बंदी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मिरज - एकीकडे खालावलेली भूजलपातळी आणि दुसरीकडे पाण्याचा अतिवापर यामुळे मिरज तालुक्‍यात अघोषित विहीरबंदी लादली गेली आहे. पूर्व भागातील 24 गावे शोषित जाहीर झाल्याने विहिरी खोदण्यावर निर्बंध आलेत. तर पश्‍चिम भागातील 20 गावांत पाण्याच्या माऱ्याने जमिनींना खारफुटी सुरू झाली आहे. तब्बल 45 गावांत विहीर खोदाई बंद आहे. 

मिरज - एकीकडे खालावलेली भूजलपातळी आणि दुसरीकडे पाण्याचा अतिवापर यामुळे मिरज तालुक्‍यात अघोषित विहीरबंदी लादली गेली आहे. पूर्व भागातील 24 गावे शोषित जाहीर झाल्याने विहिरी खोदण्यावर निर्बंध आलेत. तर पश्‍चिम भागातील 20 गावांत पाण्याच्या माऱ्याने जमिनींना खारफुटी सुरू झाली आहे. तब्बल 45 गावांत विहीर खोदाई बंद आहे. 

भूजल सर्वेक्षण विभागाने 2011 मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार 24 गावे शोषित, अंशतः शोषित आणि अतिशोषित म्हणून जाहीर केलीत. कळंबी, कानडवाडी, मानमोडी, निलजी, सावळी, सिद्धेवाडी आणि तानंग ही सात गावे अतिशोषित ठरलीत. नांद्रे, बेडग, बोलवाड, ढवळी, एरंडोली, गुंडेवाडी, खंडेराजुरी, मल्लेवाडी, मालगाव, म्हैसाळ, नरवाड, पायाप्पाचीवाडी, शिपूर, टाकळी, वड्डी, विजयनगर व व्यंकोचीवाडी ही 17 गावे अंशतः शोषित असल्याचे भूजल विभागाचे म्हणणे आहे. या गावांत पाण्याचा अतिउपसा झाल्याने पातळी खालावली आहे. भूजलसाठ्यावर मर्यादा आल्या आहेत. शासनाच्या विविध योजनांतून शेतकऱ्यांना विहीर खोदाईसाठी अनुदान दिले जाते. तत्पूर्वी भूजल सर्वेक्षण विभागाचा नाहरकतीचा दाखला सादर करावा लागतो. 24 गावे शोषित जाहीर झाल्याने विहीर खोदाईला परवानगी मिळेना झाली आहे. अंशतः शोषित गावांत वैयक्तिक स्वरूपात विहीर खोदता येत नाही. शासनाकडून रोजगार हमीसह विविध योजनांद्वारे कोट्यवधी रुपयांचा निधी विहिरींसाठी मिळतो. भूजल विभागाच्या निकषामुळे या गावांत लाभार्थी मिळेना झालेत. त्यामुळे कोट्यवधींचा निधी शासनाला परत जाण्याच्या मार्गावर आहे. लाभार्थी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना धडपड करावी लागत आहे. 

भूजल विभागातर्फे सरासरी तीन-चार वर्षांतून एकदा सर्वेक्षण केले जाते. मिरज तालुका कृषी विभागाकडे 2011 मधील सर्वेक्षणाची यादी देण्यात आली आहे; तिच्या आधारे विहिरींच्या प्रस्तावांवर निर्णय होत आहेत. पूर्व भागातील 24 गावांतील विहिरींचे प्रस्ताव फेटाळले जात आहेत. गरजू शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित रहात आहेत. 

पश्‍चिम भागात कृष्णा व वारणा नदी आणि धडक सिंचन योजनांमुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. विहिरी खोदण्याचे प्रमाण अत्यल्प आहे; त्यामुळे या भागातही लाभार्थी मिळेना झालेत. 64 पैकी 45 गावांत विहिरींचे खोदकाम बंद आहे. एका अर्थाने तालुक्‍यावर अघोषित विहीरबंदी लादली गेली आहे. 

"भूजल'चे काम शंकास्पद  
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाबाबत शंका घ्यावी, अशी स्थिती अनेक गावांत आहे. म्हैसाळ व ढवळीच्या उशाला नदीचे पाणी पसरले आहे. पन्नास-शंभर फूट खोदले तरी पाण्याचे उमाळे फुटतात. भूजलने ही गावे अंशतः शोषित म्हणून जाहीर केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. नरवाड, विजयनगरमध्येही धडक योजनांचे पाणी उपलब्ध आहे. चारही बाजुंना बागायती फुलली आहे. तरीही ती शोषितमध्ये गेलीत. निलजीपासून एक किलोमीटरवर कृष्णा नदी आहे. पावसाळ्यात पाणी गावाला येऊन धडकते. तरीही हे गाव अतिशोषित म्हणून जाहीर केले आहे. 

""प्रत्येक तीन-चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यावर्षीही नवे सर्वेक्षण होणार आहे. मिरज तालुक्‍याकडे जुनी यादी असावी; त्यानुसार निर्णय घेतले जात असावेत. 2015-16 मध्ये सर्वेक्षण झाले होते; त्या यादीनुसार गावांच्या संख्येत बदल झालेला असू शकतो.'' 
श्री. मिसाळ,  भूजल सर्वेक्षण विभाग

Web Title: miraj news well water