कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

डिझेलमध्ये ३ रुपयांचा फरक - सीमाभागातील पंपांना झळ

मिरज - ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपयांनी, तर डिझेलची किंमत सुमारे तीन रुपयांनी कमी झाली आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील सीमाभागातील पेट्रोल पंपांवरील विक्रीला बसत आहे. इंधन दरातील मोठ्या फरकामुळे वाहन चालक कर्नाटकातील पंपांना पसंती देत आहेत. ग्राहक आकर्षित करण्यासाठी कर्नाटकात सीमाभागातील पंपचालकांनी रस्त्यावर दरातील तफावत स्पष्ट करणारे मोठे फलक लावले आहेत.

१ जुलै रोजी ‘जीएसटी’ लागू झाला त्यादिवशी पेट्रोल दरातील फरक सव्वानऊ रुपये होता. कर्नाटकातील पेट्रोल स्वस्त होते. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात पेट्रोल कंपन्यांकडून लागू केला जाणारा स्टेट स्पेसिफिक  सरचार्ज रद्द करण्यास केंद्राने संमती दिली. त्यामुळे पेट्रोलच्या किमती ६६ पैसे ते १ रुपये ७७ पैशांनी खाली आल्या. डिझेलच्या किमती १.२५ रुपये ते  १.६६ रुपयाने कमी झाल्या. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकातील पेट्रोलच्या दरातील फरक सव्वासात ते आठ रुपयांवर आला. महाराष्ट्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलवर लावले जाणारे विविध कर दरवाढीला कारणीभूत ठरले आहेत. 

जीएसटीची घोषणा झाल्यानंतर कर्नाटक सरकारने काही कर हटवले. पाच टक्के अधिभार काढून टाकला; त्यामुळे इंधनाच्या किमती सात ते नऊ रुपयांनी कमी झाल्या. सध्या कर्नाटकातील डिझेलचे दर सर्वांत कमी आहेत. आंध्र, तमिळनाडू, तेलंगणा, केरळ आदी राज्यांच्या तुलनेत डिझेल स्वस्त आहे; त्यामुळे आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या वाहनांनी डिझेलसाठी कर्नाटकला पसंती दिली आहे.

जीएसटीचा परिणाम 

गुरुवारचा फरक
गुरुवारी (ता. १३) कर्नाटकमधील पंपांवर पेट्रोलचे सरासरी दर ६५ रुपये सात पैसे प्रतिलिटर होते. डिझेलचा दर ५४ रुपये ८३ पैसे होता. महाराष्ट्रात तो अनुक्रमे ७३ रुपये २५ पैसे आणि ५८ रुपये २२ पैसे होता. कर्नाटकातील पेट्रोल महाराष्ट्रापेक्षा तब्बल ८ रुपये १८ पैशांनी स्वस्त होते. डिझेल ३ रुपये ३९ पैशांनी स्वस्त होते.

जीएसटी लागू केल्यास फायदा - आरवट्टगी
पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संतोष आरवट्टगी म्हणाले, ‘‘दोन राज्यांतील किमतीतील फरक सीमाभागातील पंपांना त्रासदायक ठरत आहे. कर्नाटकात शंभर लिटर डिझेल घेतले तर वाहनमालकाचे सुमारे सव्वातीनशे रुपये वाचतात; त्यामुळे कर्नाटकातून  येतानाच डिझेल भरून घेण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सीमाभागातील पंप चालवायचे कसे ? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील करांचे प्रमाण सरासरी २८ टक्के आहे. जीएसटी लागू केल्यास इंधनाच्या किमती स्वस्त होतील. इंधन व्यावसायिकांची संघटना (फामपेडा) यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे.

Web Title: miraj sangli news petrol cheap in karnataka