आता काय म्‍हणायचं... नगरसेवकाने उतरविली पॅंट 

Balasaheb Khandare
Balasaheb Khandare

सातारा : येथील नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांनी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवली. त्यानंतर स्वतःची पॅंट उतरवण्याची अभद्र कृती केली. त्यामुळे पालिकेत गोंधळ उडाला. त्याच्या निषेधार्थ पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. 

वॉर्ड क्रमांक सातमधील शौचालयांच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या अजेंड्यावर घेतले जात नसल्याची नगरसेवक खंदारे यांची तक्रार होती. सत्ताधाऱ्यांकडून आपले विषय जाणीवपूर्वक अडविले जात असल्याचा आरोपही खंदारे यांनी केला होता. आज सकाळी साडेदहा वाजता उपमुख्याधिकारी धुमाळ यांच्या दालनामध्ये खंदारे यांनी प्रवेश केला. आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवली. "तुम्ही आमची कामे करत नाहीत, आता मी इथेच घाण करतो', असा इशारा दिला. त्यानंतर अधिक आक्रमकपणे ते थेट टेबलावर चढले. त्यावर कहर करत स्वतःची पॅंट गुडघ्यापर्यंत खाली घेतली. 

पालिकेत गोंधळाचे वातावरण

श्री. धुमाळ यांनी खंदारे यांना टेबलावरून उतरण्याची विनंती केली. तसेच त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. सभासचिव अतुल दिसले यांना समक्ष बोलावून स्थायीचा अजेंडा वाचायला दिला. विषयपत्रिकेवर शंभर व एकशे एक क्रमांकावर विषय घेण्यात आल्याचे समजताच खंदारे पॅंट घालून खुर्चीत बसले. तरीही नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्येही घाण करणार, असे इशारे खंदारे हे देतच होते. काही वेळानंतर खंदारे तेथून निघून गेले. या घटनेमुळे पालिकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

पालिका सभेवर बहिष्कार टाकणार

खंदारेंच्या कृतीचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून पालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. जोपर्यंत दहशतमुक्त वातावरण पालिकेत तयार होत नाही, तोपर्यंत कोणीही काम करणार नाही, असे निवेदन कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे व मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिले.

बाळू खंदारे यांची पालिका कर्मचाऱ्यांना नेहमीच दमदाटीची भाषा असते. त्यामुळे कर्मचारी तणावात असून, कामकाज कालावधीनंतर त्यांना त्यांच्या जिवाची शाश्‍वती राहिली नाही. त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, शासकीय कामकाजात लोकप्रतिनिधीच अडथळा आणू लागले तर आम्ही दाद कोणाकडे मागायची, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. सोमवारी (ता.16) पालिकेची सभा होत असून, या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 


खंदारेंकडून ब्लॅकमेलिंगची भाषा 

खंदारे विविध विभागात येऊन अर्वाच्च भाषेत, मोठ्या आवाजाने दंगा करून, दमदाटीची ब्लॅकमेलिंगची भाषा वापरतात. नियमात न बसणारी कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात, काही माणसे सोबत घेऊन दमदाटी करून कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण करतात. कर्मचाऱ्यांच्या स्वत:च्या जिवाची भीती निर्माण झाली आहे. खंदारे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com