शिवाजी पेठेत राजकारणाची ‘मिसळ’ चर्चा

शिवाजी पेठेत राजकारणाची ‘मिसळ’ चर्चा

कोल्हापूर - निवडणूक आली की कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू होतात. राजकीय नेते त्या त्या गल्लीतील स्थानिक नेत्यांच्या घरी गाठीभेटी सुरू करतात. कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ‘डिनर डिप्लोमसी’सह विविध क्‍लृप्त्यांचा वापर राजकीय नेत्यांकडून होत आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनीही आज शिवाजी पेठेतील जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी थेट ‘मिसळ पे चर्चा’ घडवून संपर्क अभियानास सुरवातच केली.

शिवाजी पेठेतील राजकारणाचे आणि तरुणांपासून वयस्करांचे संपर्काचे प्रमुख केंद्र ठरलेल्या हॉटेल विठाईच्या दारात खासदारांची गाडी थांबते. कार्यकर्ते एकत्र होऊ लागतात. हॉटेलचे मालक अशोक जाधव यांच्यासोबत बबनराव कोराणे, तुकारामबापू इंगवले, माजी महापौर बाजीराव चव्हाण, मोहन शेळके, विलास साळोखे, जयसिंग जाधव, व्ही. एस. पाटील आदी ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणतीही प्रस्तावना किंवा औपचारिकता न पाळता थेट मिसळचा आस्वाद घेत चर्चा सुरू झाली. मालक जाधव आणि बबनराव कोराणे यांनी भीमराव महाडिक यांची आठवण काढत व्यायाम आणि तालमीच्या गप्पा सुरू केल्या. त्यातच खासदार महाडिक यांनी कॉलेज जीवनातील सहकारी चंद्रदीप नरके, सुजित चव्हाण आदी कार्यकर्त्यांची आठवण काढून विद्यापीठाच्या स्टुडंट्‌स कौन्सिल निवडणुकीची आठवण सांगितली.

यावर काहींनी ‘‘साहेब, जुन्या मित्रांना पण प्रचारात निमंत्रित करा,’’ असे सांगितले. यावर संपूर्ण हॉटेल हास्यात बुडाले. महाडिक यांनी गेल्या निवडणुकीत शिवाजी पेठेने भरघोस मते दिल्याचे सांगत राजकीय काही नको, मिसळ आणि वडापावबाबत बोलूया, असे म्हणत या चर्चेला विराम दिला. यानंतर खासदारांच्या अभिनंदनाचीही चर्चा झाली. 
यानंतर मात्र उभा मारुती चौकात खासदार महाडिक यांची सकाळची ‘मिसळ पे चर्चा’ आणि चर्चेतील शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवाजी पेठेतील जेवणावेळी लावलेली उपस्थिती या संपर्क अभियानाची चर्चा दिवसभर रंगली होती.

परंपरा जपण्याचे महाडिकांचे आवाहन
गेल्या निवडणुकीत शिवाजी पेठेतून महाडिक यांना भरघोस मतदान मिळाले होते, असे सांगून शिवाजी पेठेची पुरोगामी परंपरा जपण्याचे आवाहन महाडिक यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com