पूरग्रस्त भागांत ‘मिशन स्वच्छता’

Cleaning
Cleaning

कोल्हापूर - सलग सात दिवस धोक्‍याच्या पातळीपेक्षा ११ फूट जास्त पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंचे रौद्र रूप कमी झाले असून, आज पंचगंगेची पातळी धोका पातळीपेक्षा कमी झाली. जिल्ह्यातील ५३ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या कामासाठी शहरात कोल्हापूरसह बृहन्मुंबई महापालिकेचे पथकही दाखल झाले. करवीरसह जिल्ह्यातील २४९ मृत जनावरांचा शास्त्रीय पद्धतीने आज विल्हेवाट लावण्यात आली. कोल्हापूर शहरासह शिरोळ तालुक्‍याल महापुराचा पडलेला विळखा कालपासून सैल होत आहे. काल सायंकाळी ४४ फूट सहा इंचावर वाहणारी पंचगंगा आज रात्री आठ वाजता ४१ फुटांवरून वाहत होती. पंचगंगेची धोक्‍याची पातळी ४४ फूट आहे. पुराचे पाणी ओसरू लागल्याने पूरग्रस्त भागात स्वच्छतेची मोहीम व्यापक स्वरूपात राबवण्यात येत आहे. यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांसह बीव्हीजी ग्रुप व राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला आहे. शहरातील पूरग्रस्त भागात पाणी घुसल्याने उद्‌ध्वस्त झालेला संसार सावरण्यासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू होती.  
जिल्ह्यात पावसाचा जोरही कमी झाला आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १८ मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्‍यात झाला. आजअखेर जिल्ह्यात २१३३ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १७७२ मिलिमीटर पाऊस पडतो. करवीर तालुक्‍यातील आंबेवाडी व चिखलीला पडलेला महापुराचा वेढा कमी झाला असला, तरी शिरोळ तालुक्‍यातील काही गावांतील पूरस्थिती अजूनही कायम आहे. पुराच्या पाण्यात वाहून मरण पावलेल्या जनावरांचा खच रस्त्याच्या कडेला पडला होता. या जनावरांची शास्त्रीय पद्धतीने मोठे खड्डे काढून विल्हेवाट लावण्यात आली. या कामासाठी अर्थमूव्हर्स असोशिएशनने मदत केली. 
जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली असून, अजूनही राधानगरीतून १४००; तर कोयनेतून २७ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागातील बहुतांशी गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम आजही सुरू होते. जाधववाडी येथील वीज केंद्रात घुसलेले पाणी काढण्यासाठी चार टॅंकर व १५ मशिनचा वापर करण्यात आला. शहरात अजूनही पाणीपुरवठा विस्कळित असून, लोकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टॅंकरची सोय करण्यात आली आहे. 

तालुकानिहाय पाऊस असा (आकडे मिलिमीटरमध्ये, कंसात १ जूनपासूनचा पाऊस)
हातकणंगले - ०.६३ (७५७.१७), शिरोळ निरंक - (५३१.७१), पन्हाळा - ४ (२०६२.४३), शाहूवाडी - १६.१७ (२३७४.१७), राधानगरी - ४.३३ (२५६०.३३), गगनबावडा - १८ (५०७७), करवीर - २.२७ (१५८१. ६४), कागल - १ (१६९९.२९), गडहिंग्लज - १.८६ (१२९७.७१), भुदरगड - ४.२० (२२७८.६०), आजरा - ५ (२७४८), चंदगड - ३.३३ (२६३३.६७).

मृत जनावरांसाठी ३० हजार
ज्यांची जनावरे पुरामध्ये मृत्युमुखी पडली आहेत अशा पूरग्रस्तांना ३० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून अभ्यास करून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरभागात वळवण्याचे विचाराधीन आहे, अशी माहिती सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

दृष्टिक्षेपात
- पूर ओसरू लागला
- मृत २४९ जनावरांची विल्हेवाट
- शहर स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर
- स्वच्छतेसाठी मुंबईचेही पथक कोल्हापुरात
- अजूनही ५३ बंधारे पाण्याखाली
- कोल्हापूरहून कोकण, मुंबई, पुणे वाहतूक सुरळीत
- शरद पवारांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
- मंत्री सुभाष देशमुख यांचा पूरग्रस्तांना दिलासा
- आरोग्यतपासणी मोहिमेवर आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखरेख
- धरणांतील विसर्गही झाला कमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com