पार्वतीनगर परिसरात मैलामिश्रित पाणी घरांत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पाच दिवसांपासून पार्वतीनगर परिसर मैलामिश्रित पाण्याने त्रस्त आहे. लोकांच्या घरांत हे पाणी शिरले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता आहे. पार्वतीनगरमधील अनेक रहिवाशांनी पहिल्या मजल्यावर तर काहींनी नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे.

-अमोल पाटील, रहिवाशी. 

कऱ्हाड  ः सांडपाणी व्यवस्था असूनही ती बिनकामाची झाल्यामुळे विद्यानगरातील पार्वतीनगर पावसाच्या पाण्याने जलमय तर बनलेच आहे; पण नागरिकांच्या घरांत मैलामिश्रित पाणी शिरले आहे. त्यामुळे मैलामिश्रित पाणी घरांत व रहिवाशांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयांपासून हाकेच्या अंतरावरील पार्वतीनगरमध्ये ड्रेनेज व्यवस्थेचा उडालेला बोजवारा स्थानिक प्रशासन कधी गांभीर्याने पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. तेच स्वप्न उराशी बाळगून अनेकांनी विद्यानगरमधील सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयासमोर पार्वतीनगरमध्ये अनेकांनी जागा घेऊन घरे बांधली. काहींनी बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट खरदी केले. सुरवातीपासून या भागात ड्रेनजची समस्या कायम आहे. त्यात मध्यंतरीच्या काळात पार्वतीनगरसह परिसरात ड्रेनेज व्यवस्था करण्यात आली. मात्र, ड्रेनेजसाठी टाकलेल्या पाइपमध्ये घाण अडकून बसल्याने ड्रेनेज पुढे सरकत नसल्याने पुन्हा मागे येत आहे. त्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे विद्यानगरमध्ये पाणीच पाणी झाले आहे. त्यात पार्वतीनगरमध्ये कहरच झाला आहे. पावसाच्या पाण्यात मैलामिश्रित पाणी मिसळल्याने सर्वत्र दुर्गंधी तर पसरलीच आहे. मात्र, हे मैलामिश्रित पाणी नागरिकांच्या घरांत शिरले आहे. त्यामुळे ज्यांच्या घराला पहिला मजला आहे, त्यांनी तेथे स्थलांतर केले आहे. घरात शिरलेल्या पाण्यात मैला तरंगत असल्याचा किळसवणा प्रकार नागरिकांना "तोंड दाबून' सहन करावा लागत आहे. अनेकांनी विद्यानगर, ओगलेवाडी येथील नातेवाईकांच्या घरांत आसरा घेतला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने आता रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मैलामिश्रित पाणी घरात व घरासमोर असल्याने डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे व सध्या सुरू असलेल्या डेंगीच्या साथीने नागरिक भयभीत झाले आहेत. सैदापूर ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देवून ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करण्याची गरज असून, सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजनेसाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे. रोगराई पसरू नये, यासाठी ग्रामपंचायतीने औषध फवारणीसह उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In mixed water houses in Parvatinagar area