आमदार अभय पाटील यांचे ट्वीट चर्चेत, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी

मल्लिकार्जुन मुगळी
Wednesday, 13 January 2021

2004 साली अभय पाटील तत्कालीन बागेवाडी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले

बेळगाव  - बंगळूरात मंत्रीमंडळ विस्तार सुरू असतानाच बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केलेले ट्‌वीट आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. 'मान-सन्मान मिळविण्यासाठी अन्य मार्गांचा अवलंब न करता पक्षनिष्ठा व पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही. आजचा हा प्रकार अंत्यंत क्‍लेषदायक आहे. वैचारीक निष्ठा व पक्षनिष्ठा ही दुर्बलता नव्हे' या आशयाचे ट्‌वीट त्यांनी कन्नड भाषेत केले आहे. 

भारतीय जनता पक्षातून तीनवेळा आमदार झालेल्या आमदार अभय पाटील यांच्या या ट्‌वीटचा अन्वयार्थ काय? अशी चर्चा बुधवारी (ता.13) दिवसभर बेळगावात सुरू होती. मंत्रीमंडळ विस्तार सुरू असतानाच त्यांनी हे ट्‌वीट केल्यामुळे ते पक्षनेतृत्वावर नाराज आहेत का? असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे. 8 जानेवारी रोजी नगरविकासमंत्री बैराती बसवराज यांच्या महापालिकेतील आढावा बैठकीनंतर माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष व माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांच्याशी अभय पाटील यांचा वाद झाला होता. त्यामुळे अभय पाटील राज्यभरात चर्चेचा विषय बनले होते. आता पुन्हा त्यांच्या ट्‌वीटमुळे ते चर्चेत आले आहेत. मंत्रीमंडळ विस्तारात अभय पाटील यांचे नाव चर्चेत नव्हते, पण मंत्रीपदासाठी इच्छुक होते. यावेळी मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरीचे आमदार व माजी मंत्री उमेश कत्ती यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले. मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेल्या अभय पाटील यांनी ट्‌वीटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चाही बेळगावात होती. 

2004 साली अभय पाटील तत्कालीन बागेवाडी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. 2008 साली विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना झाली, त्यात बागेवाडी मतदारसंघ रद्द झाला. बेळगाव दक्षिण हा नवा विधानसभा मतदारसंघ तयार झाला. अभय पाटील यांनी बेळगाव दक्षिणमधून 2008 ची विधानसभा निवडणूक लढविली व जिंकलीही. 2008 ते 2013 या काळात ते आमदार होते, विविध कारणांमुळे ते पाच वर्षे सातत्याने चर्चेत राहिले. 2013 साली महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार संभाजी पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पण 2018 ला पुन्हा बेळगाव दक्षिण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली व जिंकलीही. तिन्हीवेळा त्यांनी भारतीय जनता पक्षाकडूनच निवडणूक लढविली, त्यामाध्यमातून पक्षनिष्ठा दाखवून दिली.

हे पण वाचाबर्ड फल्यु तुर्त नाही तरीही चिकन हाताळा जपून

 

2018 साली भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या पण सत्ता मिळविता आली नाही. जुलै 2019 मध्ये ऑपरेशन कमळच्या माध्यमातून भाजप पुन्हा सत्तेत आले, त्यावेळी पाटील यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती. पण त्यांना पक्षनेतृत्वाने संधी दिली नाही. आता मंत्रीमंडळ विस्तारातही त्यांना डावलण्यात आल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Abhay Patil tweet