आमदारांना चिंता निकालाची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

रामराजे फलटणमध्येच
सातारा लोकसभेसोबतच माढा मतदारसंघात काय निकाल लागेल, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. येथे राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी चुरशीची लढत झाली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर संजयमामा शिंदेंची जबाबदारी होती. त्यामुळे सभापती रामराजे निकालादिवशी फलटणमध्येच थांबणार असून, त्यांनाही निकालाबाबत उत्सुकता आहे.

सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असताना आमदार उन्हाळी पर्यटनाला जाण्याच्या मूडमध्ये असतात; पण निकालाबाबत एक्‍झिट पोलचे आकडे पाहून जिल्ह्यातील आमदारांना सातारा लोकसभेच्या निकालाची चिंता लागल्याची स्थिती आहे. सध्या केवळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुटुंबीयांसमवेत परदेशी पर्यटनाला गेले आहेत, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एका समितीसोबत परदेशातील अभ्यास दौऱ्यावर होते. ते एक- दोन दिवसांत साताऱ्यात परत येणार आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्याविरोधात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी चुरशीने लढत दिली आहे. नुकतेच विविध संस्थांचे एक्‍झिट पोलची आकडेमोड जाहीर झाली. या आकडेवारीमुळे निकालाआधीच स्थानिक नेत्यांत अस्वस्थता वाढली आहे.

सुटीचा व पर्यटनाचा महिना म्हणून मे महिन्यात बहुतांश आमदार कुटुंबीयांसमवेत परदेशात पर्यटनाला जातात; पण यावेळेस मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातच लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. या निकालावरच आगामी ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेची गणिते अवलंबून आहेत.

त्यामुळे सुटीचा मूड असूनही केवळ लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चिंता असल्याने आमदार आपल्या मतदारसंघात ठाण मांडून आहेत. सध्या केवळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुटुंबीयांसमवेत परदेशी पर्यटनासाठी गेले आहेत. ते दोन जूनला परत साताऱ्यात येणार आहेत, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे समितीसोबत परदेशात अभ्यास दौऱ्यावर आहेत. ते एक- दोन दिवसांत साताऱ्यात परत येणार आहेत.

त्यामुळे २३ तारखेला जाहीर होणाऱ्या लोकसभेच्या निकालादिवशी शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात असणार आहेत. या सर्वांना आपापल्या पक्ष, आघाडी व युतीच्या उमेदवाराला विधानसभा मतदारसंघात किती मते व मताधिक्‍य मिळणार याचीच चिंता लागून राहिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Care Result to Loksabha Election 2019 Politics