'आमदार गोरेंच्या थापेबाजीला भुलू नका' - डॉ. दिलीप येळगावकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

औंधसह १७ गावांचा शेती पाण्याचा प्रश्न ब्रह्मपुरी योजनेतूनच मार्गी लागणार आहे. उरमोडी योजनेतून पाणी मिळणे अशक्‍य आहे; पण मुंबई येथे बैठका घेऊन विद्यमान लोकप्रतिनिधी या भागातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.
- डॉ. दिलीप येळगावकर

औंध - औंधसह १७ गावांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य  ब्रह्मपुरी योजनेतून कायमस्वरूपी संपविण्यासाठी आपण जातीने स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार आहोत. त्यासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. त्याबाबत शासन सकारात्मक असून, शेती- पाणी प्रश्न सोडविण्याचा खोटा कळवळा आणणाऱ्या विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या थापेबाजीला भुलू नका, असा टोला माजी आमदार, डॉ. दिलीप येळगावकर यांनी लगावला. दरम्यान, लवादाच्या निर्णयानंतरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती डॉ. येळगावकर यांनी दिली.

औंधसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी औंधसह परिसरातील १७ गावांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या वेळी आलिम मोदी, प्रकाश महंत, चंद्रकांत पवार, वसंत पवार, सावता यादव, प्रदीप गुजर, नवनाथ देशमुख, प्रदीप गुजर, साहेबराव देशमुख, जयवंत खराडे, केशव इंगळे, संदीप इंगळे, गणेश चव्हाण, जयसिंग घार्गे, विजय काळे, शिदू मांडवे, धनाजी आमले, ज्ञानेश्वर शिंदे, साहेबराव देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

डॉ. येळगावकर पुढे म्हणाले, ‘‘औंधसह १७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नुकताच प्राथमिक सर्व्हे पूर्ण झाला आहे. त्यामुळे टॅंकर, चारा छावण्या व अन्य बाबींवर केला जाणारा दर वर्षीचा कोट्यवधींचा खर्च वाचणार आहे. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतीनी दोन दिवसांत ठराव करावेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत शासन सकारात्मक आहे. दिल्ली येथील लवादाच्या निर्णयानंतर शेती पाणी प्रश्न ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. या वेळी गोरख पवार, धनाजी आमले, जयवंत खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. आलिम मोदी यांनी प्रास्ताविक केले. वसंत पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Jaykumar Gore Dr Dilip Yelgavkar Politics