'आमचं ठरलंय'चा पॅटर्न आता साताऱ्यातही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

कोल्हापुरात माजी खासदार धनंजय महाडीक यांच्याविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय हा पॅटर्न राबविला होता. या पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली होती. त्या निवडणुकीत महाडीक यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता हाच पॅटर्न विधानसभा निवडणुकीपूर्वी सातारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

सातारा : लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात प्रसिद्ध झालेला 'आमचं ठरलंय'चा पॅटर्न आता साताऱ्यातही पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माण, खटाव भागातले सर्व पक्षीय नेते एकवटले आहेत.

कोल्हापुरात माजी खासदार धनंजय महाडीक यांच्याविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय हा पॅटर्न राबविला होता. या पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली होती. त्या निवडणुकीत महाडीक यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता हाच पॅटर्न विधानसभा निवडणुकीपूर्वी सातारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात भाजप, राष्ट्रवादी, रासपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व माजी आमदारांची साताऱ्यात एका हॉटेलमध्ये बैठक पार पडली या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत गोरे यांना पुन्हा आमदार होऊ द्यायचे नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीपासून माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे व भाजप यांच्यात ऋणानुबंध घट्ट होताना दिसत आहेत. परंतु हे लागेबांधे स्थानिक नेत्यांना अजिबात पचनी पडत नाहीत असे एकंदरीत चित्र आहे. या बाबत गेल्या काही महिन्यांपासून गावागावात बैठका घेतल्या जात आहेत. परंतु आता अशीच एक महत्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक आज साताऱ्यात पार पडली. जयकुमार गोरेंच्या विरोधात सर्व पक्षांनी मिळून एकत्र लढण्याचा महत्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला. या मध्ये भाजप, राष्ट्रवादी, रासप आणि काँग्रेस हे सर्व पक्ष एकत्र असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे गोरेंच्या भाजप प्रवेशावर स्थानिक भाजप पदाधिकारी सुद्धा उठावाच्या भूमिकेत असल्याने आता पक्षश्रेष्ठी गोरेंबाबत काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. एकूणच काय तर काँग्रेसमध्ये राहून भाजपचा खासदार निवडून आणणाऱ्या जयकुमार गोरेंना स्वतःपुन्हा आमदार होण्यासाठी मार्ग खडतर आहे हे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Jaykumar Gore now in danger zone for assembly election