सांगली झेडपीचे सीईओ गुडेवार यांच्या बदलीसाठी भाजप आमदारांचे पत्र 

gudewar
gudewar

सांगली ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीसाठीच्या गुप्त हालचाली आज उघड झाल्या आहेत. गुडेवार यांनी धडाक्‍यात शिस्तीचा कार्यक्रम लावल्याने नाराज राजकीय नेत्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठाण मांडल्याने वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहले आहे. गुडेवार हे विश्‍वासात न घेता काम करतात, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला बाधा येत असल्याचे कारण देत आमदार खाडे यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. 


जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी राहिलेल्या चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे अभिजित राऊत यांच्या बदलीनंतर पूर्णवेळ पदभार आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत त्यांनी "गुडेवार क्‍या चीज है' हे दाखवून देण्याचा धडाकाच लावला आहे. अमरावती, सोलापूर येथे राजकीय नेत्यांना कायद्याच्या वळंब्यात आणून चर्चेत आलेल्या गुडेवार यांचा लौकिक तिरक्‍या चाली खेळणाऱ्यांसाठी अडचणीचाच राहिला आहे. त्यातूनच त्यांच्या बदलीसाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या पातळीवर हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यात केवळ भाजपच नव्हे तर विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील काही सदस्यांचाही समावेश होता.

पैकी काहीजणांच्या मागे चौकशीचे शुक्‍लकाष्ठ लागले असून काहीजणांचे छुपे मनसुबे गुडेवार यांच्या "पूर्णवेळ पदभार'मुळे अडचणीत आले आहेत. त्यांनी आमदार सुरेश खाडे यांच्याकडे ठाण मांडून गुडेवार यांच्या बदलीसाठी प्रयत्न करण्याची गळ घातल्याचे चर्चेत होते. त्याला आता दुजोरा मिळाला असून आमदार खाडे यांनी हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवून गुडेवार यांच्या बदलीची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com