आमदार प्रणिती शिंदे यांना अखेर जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांना बुधवारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

सोलापूर : शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांना बुधवारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहण्याची तसेच तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून तपासकामात सहकार्य करण्याची अट घालण्यात आली आहे. 

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला होता. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्‍काबुक्की केली होती. प्रकरणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण आणल्याचा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

या प्रकरणात माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करीम शेख आदींना याअधीच जामीन मिळाला आहे. 

आमदार शिंदे आणि नगरसेवक नरोटे यांना न्यायालयात हजर होण्याबाबत जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले होते. बुधवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही आरोपींना 15 हजार रुपयांचा जातमुचलक्‍यावर जामीन देण्यात आला. दोन्ही आरोपींनी 16 ते 18 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 10 ते 1 या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून तपासकामात सहकार्य करावे, केसचा निकाल होईपर्यंत दर तारखेला न्यायालयात हजर राहावे, आरोपींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सरकारी साक्षीदारांवर दबाव आणू नये, त्यांना फूस लावू नये, कोणत्याही अटींचा भंग झाल्यास जामीन रद्द समजण्यात यावा अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Praniti Shinde granted Conditional bail