आमदार सतेज पाटील यांची महाडिक यांच्यावर 'ही' टीका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

सर्किट हाऊस येथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची आमदार सतेज पाटील यांनी भेट घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले

कोल्हापूर - जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचीच सत्ता येणार हे सांगत असतानाच, महाडिक यांची राजकारणातून यापूर्वीच एक्‍झिट झाली आहे. त्यामुळे एक्‍झिट झालेल्यांची एंट्री होईलच कशी, असा सणसणीत टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता लावला. शिवसेनेचे सर्वच सदस्य महाविकास आघाडीत येतील, असा विश्‍वास आमदार पाटील यांनी व्यक्‍त केला.

सर्किट हाऊस येथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची आमदार सतेज पाटील यांनी भेट घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या भेटीनंतर सर्व सदस्यांना सहलीवर पाठवले. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या जि. प. सदस्यांची वर्षाखेर गोव्यात 

शिवसेनेचे सर्व सदस्य आघाडीसोबतच

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी आवश्‍यक संख्याबळ आघाडीकडे आहे. एवढेच नव्हे तर मॅजिक फिगरपेक्षा कितीतरी अधिक सदस्यांचा पाठिंबा आघाडीच्या सदस्यांना राहील, असा विश्‍वास आमदार पाटील यांनी व्यक्‍त केला. तसेच सर्व मित्रपक्ष आजही सोबत असल्याचे सांगत आमदार प्रकाश आवाडे गटानेही आमच्यासोबतच राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे सर्व सदस्य आघाडीसोबतच येतील, असा दावाही आमदार सतेज पाटील यांनी केला.

हेही वाचा - केएसए चषक : शिवाजी तरूण मंडळची खंडोबावर मात

संघटना सदस्यांनी घेतली भेट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते महाविकास आघाडीत राहणार आहेत. आज संघटनेचे सदस्य डॉ. पद्माराणी पाटील यांचे पती राजेश पाटील व शुभांगी शिंदे यांचे पती रामचंद्र शिंदे यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. संघटनेला पद देण्याची मागणी त्यांनी श्री.पाटील यांच्याकडे केली. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन श्री. पाटील यांनी संबंधित सदस्यांना दिले.

व्हीप डावलणाऱ्यांची खैर नाही

गतवेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी काँग्रेस, राष्ट्रवादीने व्हीप काढला होता; मात्र तो व्हीप दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी डावलला. यावेळी व्हीप डावलण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला. गतवेळी आम्ही दुर्लक्ष केले. मात्र यावेळी दुर्लक्ष केले जाणार नाही. एकही सदस्य पक्षविरोधी भूमिका घेणार नाही, असा विश्‍वास आमदार पाटील यांनी व्यक्‍त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Satej Patil Comments On Mahadik Kolhapur Marathi News