केएसए चषक : शिवाजी तरूण मंडळची खंडोबावर मात 

KSA Football Competition Shivaji Mandal Wins Kolhapur Marathi News
KSA Football Competition Shivaji Mandal Wins Kolhapur Marathi News

कोल्हापूर -  केएसए चषक वरिष्ठ लीग साखळी फुटबॉल स्पधेंत शिवाजी तरूण मंडळने तुल्यबळ खंडोबा तालीम मंडळ (अ) संघाचा 4- 0असा एकतर्फी पराभव केला, तर ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ व खंडोबा (ब) या दोन संघातील सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिला. 

छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. शिवाजी तरूण मंडळ व खंडोबा तालीम मंडळ (अ) यांच्यातील संपूर्ण सामन्यात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन झाले. "शिवाजी'कडून करण चव्हाण, संकेत साळोखे, ऍबीओ, रणवीर जाधव यांनी आक्रमक व वेगवान चढाया केल्या. सामन्यांच्या 14 व्या मिनिटाला "शिवाजी'कडून करण चव्हाण बंदरे याने मारलेला फटक्‍यावर चेंडू गोलपोस्टला धडकून आला. यानंतर संकेत साळोखे याने गोलची पहिल्या गोलची नोंद करीत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. खंडोबाकडूनही निखील जाधव, कपिल शिंदे, प्रभु पोवार, माणिक पाटील यांनी बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. शिवाजीच्या ऍबीओ अकिमची चढाई खंडोबाच्या गोलरक्षक रणवीर खालकर याने आक्रमकपणे रोखली. त्यानंतर ऍबीओने पुन्हा चढाई करीत 23 व्या मिनिटाला दुसऱ्या गोलची नोंद करीत संघाची आघाडी भक्कम केली. 

उत्तरार्धात दोन गोलची आघाडी असल्याने शिवाजीने पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळी केली, तर खंडोबाला बचावात्मक खेळ करावा लागला. खंडोबा (अ)च्या कपिल शिंदे व प्रभु पोवार यांच्या गोल करण्याच्या संधी वाया गेल्या. शिवाजीकडून मात्र आक्रमक व वेगवान चढाया करण्यात आल्या. दरम्यान, सामन्यांच्या 49 व्या मिनिटास मिळालेल्या संधीवर संकेत साळोखे याने मैदानी गोल करीत संघाला 3-0अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 79 व्या मिनिटास डेव्हीडच्या पासवर करण चव्हाण बंदरे याने गोल करीत संघाची ही आघाडी 4 -0 अशी केली. आणि याच गोल संख्येवर सामनाही जिंकला. दोनही संघ शिवाजी पेठेतील असले तरी सामना पाहण्यासाठी आज मैदानावर शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. 
साखळी स्पर्धेतील पहिला सामना ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ व खंडोबा तालीम मंडळ (ब) यांच्यात झाला. हा सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहीला. ऋणमुक्तेश्वरकडून निलेश ढोबळे, अनिरूद्ध शिंदे, ऋषिकेश पाडळकर, स्वराज्य पाटील, तर खंडोबा (ब) कडून निखील बचाटे, ओंकार चौगुले, प्रविण घाटगे यांनी उत्कृष्ट चढाया केल्या; पण दोन्ही संघातील खेळाडूंना चढायांचे गोलमध्ये परिवर्तित करण्यात यश आले नाही. 

यापुर्वीच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाच्या पाठीराख्यांनी मैदानावर झेंडा फ़डकवल्याबद्दल संघाला नोटीस दिली होती. दरम्यान मंगळवारी (ता. 24) दोन्ही संघाच्या व्यवस्थापकांना बोलावून पोलिसांनी समज दिली. तसेच आजच्या सामन्यात मैदानावर समर्थकांकडून अनुचित प्रकार घडल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल अशा आशयाची कायदेशीर नोटीस शिवाजी तरूण मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांना कायदेशीर बजावली होती. 

गुरुवारचे सामने 

  • दु. 2.वा. मंगळवार पेठ फुटबॉल क्‍लब विरूद्ध बी.जी.एम. स्पोर्टस 
  • दु. 4.वा. बालगोपाल तालीम मंडळ व संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम संघ 

संबंधीत बातम्या - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com