'सारे भारतीय माझे बांधव फक्त पुस्तकापुरते मर्यादित नकोत'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा आपण रोज घेतो. त्यातील "सारे भारतीय माझे बांधव आहेत...' हे वाक्‍य पुस्तकापुरते मर्यादित राहू नये, अडचणीच्या काळात ते दिसावे... केरळमधील आमच्या बांधवांपर्यंत ही मदत पोचवा, त्यांची शाळा बंद पडू देऊ नका. आमच्या पैशातून त्यांना दफ्तर द्या, असे मनोगत व्यक्त करीत होती महापालिका कन्नड शाळेतील सहावीची विद्यार्थिनी वैष्णवी गंगनाळे. निमित्त होते केरळ पूरग्रस्तांसाठी खाऊच्या पैशातून जमविलेला निधी "सकाळ रिलीफ फंडा'कडे सुपूर्द करण्याचे. 

सोलापूर- भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा आपण रोज घेतो. त्यातील "सारे भारतीय माझे बांधव आहेत...' हे वाक्‍य पुस्तकापुरते मर्यादित राहू नये, अडचणीच्या काळात ते दिसावे... केरळमधील आमच्या बांधवांपर्यंत ही मदत पोचवा, त्यांची शाळा बंद पडू देऊ नका. आमच्या पैशातून त्यांना दफ्तर द्या, असे मनोगत व्यक्त करीत होती महापालिका कन्नड शाळेतील सहावीची विद्यार्थिनी वैष्णवी गंगनाळे. निमित्त होते केरळ पूरग्रस्तांसाठी खाऊच्या पैशातून जमविलेला निधी "सकाळ रिलीफ फंडा'कडे सुपूर्द करण्याचे. 

महापालिकेच्या शाळांमध्ये कष्टकरी, गरीब घरची मुले असतात. केरळच्या पुराची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेतील डिजीटल फलकावर तेथील स्थितीही दाखवली. पुराची दृश्‍ये पाहून व्यावहारीक जगाबाबत अजून अजाण असलेल्या या बालकांनाही गहीवरून आले. शिक्षकांनी मदतीचे आवाहन केले, त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला खारीचा वाटा उचलला. एक रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत मदत दिली. त्यामध्ये शिक्षकांनी आपला वाटा टाकला आणि बघता-बघता सहा शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून 7001 रुपये जमा झाले. ही रक्कम त्यांच्या दृष्टीने फार मोठी आहे. वरिष्ठ बातमीदार विजयकुमार सोनवणे यांनी धनादेश स्वीकारला. 

ज्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी इतरांची मदत घ्यावी लागते, त्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे मदत करीत, स्वयंघोषित "लोकसेवकां'च्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. वैष्णवीसह किरण जमादार व महेंद्र कांबळे या तिसरीच्या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. सामाजिक जाणीव काय असते हे त्यांची भाषणे ऐकल्यावर दिसले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अमोल भोसले, नागेश गोसावी, गणेश धनवटे, विशाल मनाळे, अप्पासाहेब ककमारे, अविनाश हिंगणे, अर्चना मासाळ, किर्ती शाबादे, मंगला शिंगे, गंगा शिंदे यांनी परिश्रम घेतले. 

"सकाळ रिलीफ फंडा'कडे दिलेली रक्कम संबंधितांपर्यंत निश्‍चित पोचते याचा विश्‍वास आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी आमचा खारीचा वाटाही महत्त्वाचा ठरेल याची खात्री आहे. 
- अमोल भोसले, अध्यक्ष महापालिका शिक्षक संघटना

Web Title: MNP solapur school student donates Money for sakal relief fund