देशाच्या वाटचालीचे ‘मोदीपर्व’मधून समग्र आकलन - सुधींद्र कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा काळ म्हणजे केवळ सत्तांतराचा नव्हे, तर समाजाचे एकूणच दिशा परिवर्तन करणारा ठरला. या काळातील प्रत्येक धोरणाचे, वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचे आणि एकूणच देशाच्या वाटचालीचे ‘मोदीपर्व’ या पुस्तकातून समग्र आणि अगदी परखडपणे आकलन मांडले आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्‍लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी केले.

कोल्हापूर - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा काळ म्हणजे केवळ सत्तांतराचा नव्हे, तर समाजाचे एकूणच दिशा परिवर्तन करणारा ठरला. या काळातील प्रत्येक धोरणाचे, वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचे आणि एकूणच देशाच्या वाटचालीचे ‘मोदीपर्व’ या पुस्तकातून समग्र आणि अगदी परखडपणे आकलन मांडले आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्‍लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी केले.

‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक, राजकीय विश्‍लेषक श्रीराम पवारलिखित ‘मोदीपर्व’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. दरम्यान, कार्यक्रमात पवारलिखित ‘राजपाठ ः वेध राष्ट्रीय राजकारणाचा’ आणि ‘जगाच्या अंगणात ः वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा’ या दोन पुस्तकांचेही प्रकाशन झाले. 

‘देशाची राजकीय वाटचाल’ या विषयावर कुलकर्णी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘द्वेषाचं राजकारण, अंधभक्ती यापलीकडे जाऊन पवार यांनी मोदींची पाच वर्षांतील वाटचाल, निवडणुकीपूर्वी दाखवलेली  स्वप्ने आणि प्रत्यक्षात काय झालं, अशा विविध अंगांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. मोदींची सत्ता पुढे असली नसली तरीही भारतीय राजकारणाचा 
एकूणच अभ्यास करताना ‘मोदीपर्व’ एक संदर्भ ग्रंथ म्हणून महत्त्वाचे ठरणार आहे.’’

मोदींनी काही चांगल्या गोष्टी जरूर केल्या; पण मोदींना विरोध म्हणजे देशद्रोह ही बळावत चाललेली मानसिकता देशाच्या एकूणच लोकशाहीला मारक ठरणार आहे. नोटाबंदीनंतर काळ्या पैशांचं काय झालं, मोदी आणि अमित शहा निवडणुकीत जो खर्च करतात तो मग ‘व्हाइट मनी’ आहे का, काश्‍मीर प्रश्‍नाबाबत सोयीची भूमिका का घेतली गेली, शिक्षण धोरणाचं काय झालं, असे प्रश्‍न गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी कितीही प्रतिमानिर्मिती, प्रतिमाभंजन झालं तरी कुठलाही राजकीय नेता म्हणजे देश नव्हे, ही भूमिका खमकेपणाने घ्यावी लागणार आहे.’’ ‘भाजप’ला पर्याय म्हणून काँग्रेस पक्ष आता पुढे येतो आहे; पण केवळ काँग्रेसच नव्हे, तर मित्रपक्षांनी मिळून संघटितपणे अधिक नेटानं रणनीती आखली तरच तो सक्षम पर्याय होऊ शकेल, असेही ते म्हणाले. 

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, ‘‘पुस्तकाचं शीर्षक मोदीपर्व असं असलं तरी ते मोदी यांचा कार्यकाल अशा अर्थाने ठेवलं गेलं आहे. कारण या पुस्तकात कुठल्याही व्यक्तिस्तोमापेक्षा मोदी यांनी घेतलेले निर्णय, धोरणांवर सर्व बाजूंनी सखोल विश्‍लेषण मांडलं गेलं आहे.’’ संपादक- संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘२०१४ च्या निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं. राजकीय परिभाषा बदलली. नवी संवादशैली आणि त्याभोवती तयार झालेला समर्थकांचा वर्ग, त्याच्या मुळाशी असणारा सोशल मीडियाचा प्रभावी वापर असो किंवा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ‘भाजप’ने ‘अच्छे दिन’ किंवा काँग्रेसने धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवून प्रचाराची रणनीती आखणं, अशा साऱ्या घडामोडींचा वेध पुस्तकातून घेतला आहे.’’ ‘सकाळ’ प्रकाशनाचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष रामगीर यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modiparv Book Publish Shriram Pawar Writer