सावकारांनी पुन्हा काढले डोके वर!

Money
Money

सातारा - खासगी सावकारांवर मोकाची कारवाई करण्याचा धसका जिल्ह्यातील सावकारांनी घेतल्याचे चिन्ह काही दिवसांपूर्वी निर्माण झाले होते. मात्र, थोड्याच दिवसांत सावकारांनी वसुलीसाठी पुन्हा तोंड वर काढल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या धृतराष्ट्री भूमिकेमुळे सावकारी निर्मूलनाचा अधीक्षकांचा मनोदय कागदवरच राहणार काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत खासगी सावकारीचा धंदा जोरदार सुरू होता. हजार रुपयांपासून कोटी- दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटप होत होते. पोलिस ठाणे खिशात ठेवल्याप्रमाणे या सावकारांची वर्तणूक होती. एक तर गुन्हा दाखल व्हायचा नाही. झालाच तरी, सावकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे व्हायचा. त्याला सर्वच सावकार सरावले होते. अटकपूर्व जामीन किंवा एक दिवसात जामिनावर बाहेर हे ठरलेले असायचे. त्यामुळे त्यांना कोणतीही भीती राहिली नव्हती. त्यामुळे वाढलेल्या मुजोरीमुळे कर्जदाराला देशोधडीला लावण्याचे काम होत होते. एकदा त्या विळख्यात पडला की कंगाल झाल्याशिवाय कर्जदाराची सुटका होत नव्हती. जिल्ह्यातील या दुष्ट चक्राला पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पहिल्यांदा ठोसपणे छेद दिला. खासगी सावकारीबरोबरच तो करत असलेल्या प्रत्येक कृत्यासाठी ‘आयपीसी’ची कलमे गुन्ह्यात लागण्यास सुरवात झाली. त्यामुळे खासगी सावकारांचे एक- एक भयानक कारनामे समोर आले. प्रॉपर्टी लुटण्यापासून आया- बहिणींच्या अब्रूला हात घालण्याची त्यांची मजल गेल्याचेही स्पष्ट झाले. त्यातून जिल्ह्यातील सावकारांची मोठी साखळी समोर आली. अनेकांचे बुरखे फाटले. मोकाच्या या कारवायांचा धसका जिल्ह्यातील सावकारांनी घेतला. पोलिस अधीक्षकांनी रडारवर घेतलेल्या प्रत्येक सावकाराची गठडी वळली गेली. मात्र, या कारवायानंतर पोलिस दलाचे हे बळ वापरण्याचे काम प्रभारी अधिकाऱ्यांकडून ठोसपणे होताना दिसत नाही. उलट आजही अनेक जण खासगी सावकारांच्या दावणीला असल्यासारखी परिस्थिती दिसत आहे.

त्यामुळेच मोकाच्या कारवायांचा विसर पाडून खासगी सावकारांनी जिल्ह्यात पुन्हा डोकेवर काढले आहे. प्रभारी अधिकाऱ्यांनी मनात आणले, तर कोणत्याच तालुक्‍यात सावकार मुजोर होणार नाहीत. मात्र, तसे होताना दिसत नसल्याचे बोरगाव व फलटणमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांतून समारे येत आहे. खासगी सावकारांची वसुलीची मोहीम पुन्हा सुरू झाल्याचेच या घटना द्योतक आहेत. फलटण, कऱ्हाड व खटाव तालुक्‍यांतील अनेक सावकार अद्यापही खुले आहेत. या सावकारांचे जाळे मोठे आहे. अनेक सर्वसामान्य आजही त्यांच्या व्याजाच्या चरख्यात भरडले जात आहेत. त्यामुळे खासगी सावकारांविरुद्ध पुन्हा प्रभावी मोहीम सुरू होणे गरजेचे बनले आहे.

पोलिस अधीक्षकांनी पुन्हा परजावी तलवार
फलटणच्या प्रकरणात तर फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचेही समोर येत आहे. त्याची चौकशी होऊन सर्वच अधिकाऱ्यांना जरब बसेल अशी कारवाई झाली पाहिजे. केवळ कर्मचाऱ्यांना वेठीस धरून उपयोग होणार नाही. अधिकाऱ्यांकडून प्रभावी व सर्वसामान्यांचा विचार करून काम होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षकांना पुन्हा तलवार परजावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com