जन्मत:च झाले माकडाचे पिलू अनाथ !

जन्मत:च झाले माकडाचे पिलू अनाथ !

इस्लामपूर - येथील यल्लम्मा मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या चिंचेच्या झाडावर एका माकडाच्या मादीने पिलाला जन्म देऊन जीव सोडला. मात्र त्या पिलाची शुश्रूषा करून, माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिलालाही वनविभाग कात्रज येथील वन्यजीव अनाथालयात पाठवण्यात येणार आहे.

यल्लम्मा देवीच्या मंदिरामागील चिंचेच्या झाडावरती शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून एक मादी माकड मरणासन्न अवस्थेत तडफत होती. झाड उंच असल्यामुळे  लोकांनाही नेमके काय चाललेय ते कळत नव्हते व काही करताही येत नव्हते. माकड मादीची हालचाल हळूहळू कमी कमी होत होती. साधारण साडेनऊच्या सुमारास  तिने एका पिलाला झाडावरच जन्म दिला व दुसऱ्या क्षणाला जीव सोडला. पिलाला कशाचाही आधार नसल्यामुळे ते झाडावरून खाली असलेल्या घराच्या पत्र्यावर पडले. तिथे राहणाऱ्या लोकांनी त्याला खाली घेऊन दूध पाजले व एका कापडात गुंडाळून ठेवले. मात्र आता याच पुढं काय करायचं हा प्रश्न पडला होता. तिथे बघ्यांचीही गर्दी वाढलेली...

तेव्हा त्यातील एका व्यक्तीने महाराष्ट्र ॲनिमल रिट्रायव्हिंग असोसिएशनच्या प्राणिमित्रांना संपर्क करून माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष प्राणिमित्र विकास माने, विवेक शेटे व रणजित औताडे तेथे आले व त्यांनी सर्व गोष्टींची पाहणी करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. पिलाला वैद्यकीय तपासणीसाठी जनावरांच्या दवाखान्यात नेले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मादीला खाली काढून, तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पिल्लू आता चांगल्या स्थितीत असून त्याला कात्रज येथे वन्यजीव अनाथालयात पाठवण्यात येणार आहे.

‘ॲनिमल रिट्रायव्हिंग’चे अनेक जीवांना जीवदान
महाराष्ट्र ॲनिमल रिट्रायव्हिंग असोसिएशनचे सध्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी व बेळगाव या जिल्ह्यांमध्ये निसर्ग संवर्धनाचे काम चालू आहे. संस्थेमार्फत आजपर्यंत मानवी वस्तीमध्ये आलेले ३० हजारांहून अधिक साप व ७ मगरी पकडून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले आहे.

तसेच ५०० हून अधिक जखमी पक्षी, ३०० हून अधिक जखमी प्राण्यांवर वैद्यकीय उपचार करून जीवदान दिले आहे. मागील वर्षी ‘दररोज एक शाळा, सर्प जनजागृती’ हा उपक्रम राबवून ५० हजारांहून अधिक मुलांना सापांविषयी माहिती दिली.  तसेच लोकांना सापांविषयी माहिती व्हावी म्हणून इस्लामपूर शहरातील मुख्य ठिकाणी सापांच्या फोटोंसह माहिती असलेले बॅनर लावण्यात आलेले आहेत. घरात किंवा घराच्या आसपास साप, जखमी पक्षी किंवा प्राणी आढळल्यास संपर्क साधावा, अशी विनंती यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास माने यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com