पावसाळी अधिवेशनात दिसणार सातारी बाणा

उमेश बांबरे
बुधवार, 4 जुलै 2018

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (बुधवार) नागपूरला सुरू होत आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील आठ आमदार विविध प्रश्‍न व लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृह दणाणून सोडतील, अशी अपेक्षा आहे. मेडिकल कॉलेजची मान्यता, सिंचन प्रकल्पांना अपुरा निधी, साताऱ्याची हद्दवाढ, कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरण, स्वच्छ पालिका अभियानातील गैरव्यवहार, जिल्हा बॅंक नोकरभरती घोटाळा आदी विषय प्रामुख्याने मांडून त्यावरून सरकारला धारेवर धरले जाऊ शकते.

विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्‍न मांडण्याची पद्धत ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांनी या आधीच प्रश्‍न व लक्षवेधी पाठविल्या आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने गेल्या चार वर्षांत जिल्ह्याला निधी देताना सापत्नभाव ठेवला आहे. त्यामुळे विकासकामांवर मर्यादा आलेल्या दिसतात. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना जनतेपुढे आपल्या मतदारसंघात किती कामे केली, याचा लेखाजोखा मांडावा लागणार आहे. या विकासकामांसाठी निधी पदरात मिळवताना जिल्ह्यातील प्रमुख प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावाही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागपुरात होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पाच, काँग्रेसचे दोन व शिवसेनेचा एक आमदार आक्रमक होऊन निधीसाठी प्रलंबित राहिलेल्या विकासकामांबाबत सरकारला धारेवर धरतील, अशी आशा आहे.

कऱ्हाड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण 
 कोयना अभयारण्य व भूकंपग्रस्तांचे प्रश्‍न
 जावळी-पाटणमधील धरणग्रस्तांचे प्रश्‍न
 विमानतळाचे विस्तारीकरण
 कऱ्हाडची संरक्षक भिंत
 मेडिकल कॉलेजच्या मान्यतेचा प्रश्‍न

कोरेगाव-खटाव - शशिकांत शिंदे
 वसना-वांगणा प्रकल्पाची प्रलंबित कामे
 बटाटा संशोधन केंद्राचे पुढे काय?
 पुसेगाव व कोरेगाव वळण रस्ता प्रश्‍न
 मेडिकल कॉलेजच्या मान्यतेचा प्रश्‍न

सातारा-जावळी - शिवेंद्रसिंहराजे भोसले   
 सातारा पालिका स्वच्छता अभियान योजनेत गैरव्यवहार
 सातारा शहराची हद्दवाढ
 कारागृह सातारा शहराबाहेर नेणे
 उरमोडीचे उर्वरित पुनर्वसन 
 बोंडारवाडी प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता
 लावंघर उपसा सिंचन योजना मान्यता व निधी तरतूद

पाटण - शंभूराज देसाई
 ग्रामीण रस्त्यांसाठी अपुऱ्या निधीचा प्रश्‍न
 राष्ट्रीय पेयजल योजनेचा सुधारित आराखडा करावा
 ग्रामीण व डोंगरी गावांच्या रस्त्यांचा सुधारित आराखडा करावा
 जलसंपदा विभागाला निधी उपलब्ध करण्याचा प्रश्‍न
 शिवशाही बसमध्ये पत्रकारांना मोफत प्रवास 
 पत्रकारांसाठी पेन्शन योजना

फलटण - दीपक चव्हाण
 शिरवळ-बारामती रस्त्याचे रखडलेले काम
 शेतीपंपांचे प्रलंबित वीज कनेक्‍शन
 शिक्षक बदल्यांचा विषय
 मेडिकल कॉलेजच्या मान्यतेचा प्रश्‍न

माण-खटाव - जयकुमार गोरे 
 उरमोडीच्या पाण्याचा प्रश्‍न
 जिहे-कटापूर योजनेला निधीच नाही
 जिल्हा बॅंक नोकरभरती घोटाळा
 महाबळेश्‍वर-पंढरपूर रस्त्याच्या कामामुळे झालेली दुरवस्था
 मेडिकल कॉलेजच्या मान्यतेचा प्रश्‍न

कऱ्हाड उत्तर - बाळासाहेब पाटील
 कृषिपंपांची प्रलंबित वीज कनेक्‍शन 
 ग्रामीण भागातील विजेचे प्रश्‍न, अपुरा निधी
 ग्रामीण रस्त्यांच्या निधीचा प्रश्‍न
 सिंचन प्रकल्पांच्या निधीचा प्रश्‍न 

वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर मतदारसंघातील विविध विकासकामांना माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध होऊन कामे मार्गी लागली आहेत. किसन वीर कारखान्याच्या थकीत ऊसबिलाचा प्रश्‍न वगळता इतर कोणताही महत्त्वाचा प्रश्‍न अधिवेशनात मांडण्यासारखा राहिलेला नाही. वाई पालिकेची पोटनिवडणूक लागल्याने अधिवेशनात सुरवातीचे दोन-चार दिवस थांबून या निवडणुकीसाठी परत येणार आहे. 
- मकरंद पाटील, आमदार

Web Title: monsoon session start tomorrow