खचलेला रस्ता अन्‌ कठड्यांचा अभाव 

प्रशांत गुजर
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

सायगाव  - सायगाव-आनेवाडी विभागातील मोरखिंड घाटात धोकायदायक वळणांवर नसलेल्या संरक्षक कठड्यामुळे व अचानक कोसळणाऱ्या दरडींमुळे प्रवास करणे अत्यंत जीवघेणे बनले आहे. 

सायगाव  - सायगाव-आनेवाडी विभागातील मोरखिंड घाटात धोकायदायक वळणांवर नसलेल्या संरक्षक कठड्यामुळे व अचानक कोसळणाऱ्या दरडींमुळे प्रवास करणे अत्यंत जीवघेणे बनले आहे. 

सायगाव, आनेवाडीसह विभागातील रायगाव, महिगाव, दुदुस्करवाडी, दरे, मोरघर, पवारवाडी, महामूलकरवाडी, खर्शी या गावांतील लोकांना मेढ्याला जाण्याचा सोपा मार्ग म्हणून या घाटातून जाता येते. या मार्गावर वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असते. पर्यटनाचा "क' क्षेत्राचा दर्जा मिळालेले श्री क्षेत्र मेरुलिंग हे देवस्थान असल्याने व अत्यंत रमणीय असे निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे येथे महाराष्ट्रभरातून अनेक भाविक, पर्यटक येतात. सध्या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी दगडही पडण्याच्या अवस्थेत आहेत. पाऊस चालू असताना अनेक छोटे-मोठे दगड वाहनांसमोर येतात. हे दगड चुकविताना गंभीर घटना घडू शकते. पावसाळ्यात रस्त्यावर डोंगरातील लाल माती वाहून येते. त्यामुळे अनेक वाहनांची घसरगुंडी होत असते. काही ठिकाणी रस्ताही खचलेला आहे. तरीही संबंधित विभागाने आजपर्यंत या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. मेरुलिंग मंदिराकडे जातानाही मोठी वळणे असणाऱ्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट ठेवले आहे. या ठिकाणी डोंगर फोडला असल्याने दगड निसटले आहेत. ठिकठिकाणी दिशादर्शक फलकांचाही अभाव आहे. 

आवश्‍यक उपाययोजनांची गरज 
संरक्षक कठडे नसणे, रेलिंगसह दिशादर्शक फलकांचा अभाव, लाल मातीमुळे निसरडा झालेला रस्ता अशा एक ना अनेक समस्या या घाटात आहेत. वर्षानुवर्षे असलेल्या या समस्या सोडवण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसते. 

या विभागाने लवकरात लवकर घाटातील धोक्‍याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Web Title: Morakhinda Ghats no protective railing