निम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना 

निम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना 

सोलापूर - वाचन संस्कृती वाढावी म्हणून सरकार एकीकडे सोमवारी (ता. 15) गावोगावी "वाचन प्रेरणा' दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे निम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना आहेत. वाचनाची गोडी लागावी हे ध्येय असलेल्या ग्रंथालय संचालनालयाने "गाव तिथे वाचनालय' करण्याचे उद्दीष्ट ठेवले, परंतु त्यालाच घरघर लागली आहे. 

राज्यात 44 हजार 198 गावे आहेत. त्यापैकी फक्त 12 हजार 858 ठिकाणी सरकार मान्य वाचनालये आहेत. "अ', "ब', "क' व "ड' या चार गटात ती कार्यरत आहेत. सहा वर्षांपासून त्यांच्यात दर्जावाढ झाली नाही. त्यामुळे त्यातील काही वाचनालये शेवटची घटका मोजत आहेत. राष्ट्राच्या जडणघडणीत वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बौद्धिक विकासाचे शक्तिकेंद्र व सामाजिक विकासाचे ऊर्जा केंद्र म्हणून सार्वजनिक वाचनालये आवश्‍यक आहेत. नागरिकांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सर्व क्षेत्रातील विविध बाबींची व विविध विषयांची परिपूर्ण माहिती मिळावी, यासाठी सार्वजनिक वाचनालयाचे महत्त्व ओळखून सरकारने "महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम केला. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. 

कार्यान्वित वाचनालयांत अतिशय तुटपुंज्या मानधनावर ग्रंथपाल काम करत आहेत. "ड' वर्ग वाचनालयाला वर्षाला सरकार 30 हजार अनुदान देते. महागाई वाढली त्याप्रमाणात वर्तमानपत्रे, नवीन पुस्तके व वाचकांना देण्यात येणाऱ्या सुविधाही महागल्या आहेत. त्यामुळे वाचनालयाच्या अनुदानात वाढ करणे, ग्रंथपालांच्या मानधनात वाढ व नवी वाचनालयांना मान्यता द्यावी, अशा अनेक मागण्या ग्रंथालय संघटनांच्या आहेत. 

विभाग वाचनालये (सरकार मान्य) 
अमरावती 2041 
औरंगाबाद 3970 
नागपूर 1408 
नाशिक 1670 
पुणे 3143 
मुंबई 622 

2012 पासून ग्रंथालयांना नवीन मान्यता, दर्जावाढ नाही. अनुदानही तुटपुंजे आहे. त्यामुळे ग्रंथालये कशी चालवायची हा प्रश्‍न आहे. "ड' वर्गाला 30 हजार वर्षाला मिळतात. त्यातून सर्व खर्च भागवणे शक्‍य होत नाही. मात्र तरीही सरकारच्या परिपत्रकानुसार "वाचन प्रेरणा' दिन ही संकल्पना चांगली असल्याने साजरा करणार आहोत. सरकारने संघटनेच्या मागणीचा विचार करावा. 
- गुलाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष, जिल्हा ग्रंथालय संघटना, सोलापूर 

नाट्य ग्रंथालय... 
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या वतीने नाट्य चळवळ कार्यरत असावी व नवोदित कलावंताना नाटकाच्या सर्वांग बाजूचे शास्त्रशुद्ध ज्ञान व माहिती असावी, या हेतूने नाट्य ग्रंथालय उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये ग्रंथाचे व संहितांचे ग्रंथालय सुरू केले जाणार आहे. त्यात नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची भाषणे, नाट्य विषयक पुस्तके, विविध दोन व तीन अंकी संहिता, एकांकिकांच्या संहिता, मासिके उपलब्ध केली जाणार आहेत. त्यासाठी विविध पुस्तके देण्याचे आवाहन शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com