नोकरदारापेक्षा जास्त पॅकेज शेतीतून! म्हणून नोकरी सोडली

farming money
farming money

श्रीगोंदे : स्थापत्य अभियंता म्हणून शिक्षण पूर्ण करून पुण्यात खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. मात्र, वडिलोपार्जित शेती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. काही तरी वेगळे करून दाखवायचे, म्हणून नोकरी सोडली आणि गावाकडे परत आला. वडिलांकडून चार एकर शेती कसण्यासाठी घेत तीत साडेतीन एकरावर कमी अंतरावर पेरू, आंबा, लिंबू आणि संत्र्याच्या 2180 झाडांची इस्रायली तंत्रज्ञानाने आंतरपीक पद्धतीने लागवड केली. नोकरदारापेक्षा जास्त पॅकेज शेतीतून घेण्याचा त्याचा मानस आहे. 

मनोज इथापे या बेलवंडी येथील तरुणाने शेतीत आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. इंजिनिअर झाल्यानंतर त्याने पुण्यात नोकरी पत्करली. मात्र, तेथे मन रमत नसल्याने बेलवंडीला परतला. गावाकडे अभियंता म्हणून व्यवसाय सुरू ठेवत घरांच्या बांधकामांना आकार देतानाच शेती फुलविण्यासाठी वेगळा मार्ग धरला. फळबागेतून बेलवंडी परिसरात शेतकरी घामाचा पैसा कमावत असतानाच इतरांपेक्षा वेगळे काही तरी करायचे ठरवून वडिलांकडून चार एकर शेती कसण्यासाठी घेतली. 


नाशिकहून आंबा, पेरू, संत्रा व लिंबू यांची रोपे आणली आणि इतरांपेक्षा कमी अंतरावर त्यांची लागवड केली. पेरूची 620 रोपे 7 बाय 12 फुटांवर लागवड करत, त्यात शेवगा व हरभरा ही आंतरपिके घेतली आहेत. लिंबाची 360 झाडे लावताना त्यांचे अंतर 10 बाय 12 फूट ठेवले. आंबा मात्र तीन बाय 12 फुटांच्या अंतरावर लावला. संत्रा 7 बाय 12 फूट आणि शेवगा 6 बाय 12 फूट अशा अंतरावर लागवड केली. मध्यभागी झेंडूची लागवड आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही इस्रायली पद्धतीची शेती आहे.

पहिल्या वर्षाची फळबागेची तोड झाल्यावर मधली काही झाडे काढून टाकून अंतर वाढवायचे; पण तोपर्यंत त्या पिकाचा फायदा होत असतो. या सगळ्या क्षेत्रावर अर्थात ठिबक सिंचनाचे जाळे आहे. अर्ध्या एकरावर आता तो शेततळे करणार आहे. फळबाग, ठिबक व आंतरपिकांसाठी त्याला तीन लाख चाळीस हजार रुपये खर्च आला. झाडे दोन ते अडीच वर्षांची झाल्यावर या साडेतीन एकरातून वर्षाकाठी बारा ते पंधरा लाखांचे उत्पन्न (पॅकेज) सुरू होईल, असा आशावाद त्याने व्यक्त केला. 

पारंपरिक पद्धतीला तिलांजली देत आधुनिक व इस्रायली तंत्रज्ञानाचे तरुणांनी अनुकरण करून शेतीतून खरा पैसा कमावण्यासाठी कष्ट घ्यावेत. 
- मनोज इथापे, बेलवंडी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com