विमानसेवा सुरळीत होण्यासाठी आणखी प्रतीक्षा 

तात्या लांडगे
गुरुवार, 19 जुलै 2018

सोलापूर : राज्यातील काही प्रमुख शहरांमधील विमानसेवा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रयत्न झाले. त्यापैकी सोलापूर वगळता अन्य ठिकाणची विमानसेवा सुरूही झाली. परंतु, सोलापुरातील विमानसेवा श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीसह अन्य 17 प्रकारच्या अडथळ्यात अडकली आहे. अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा फटका आगामी विधानसभेत बसेल यासाठी दोन्ही मंत्री सध्या विमानसेवेबाबत गप्पच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

बोरामणी विमानतळ शहरापासून दूर असल्याने तेथे नवे विमानतळ व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून त्याठिकाणची स्थिती "जैसे थे' आहे. तोपर्यंत सध्याच्या विमानतळावर डे-नाइट लॅंडिंगची एकत्रित सोय व्हावी, यासाठीच्या अडथळ्यांची पाहणी विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यानुसार त्यांनी अहवालही शासनाला सादर केला. मात्र, त्याबाबत अद्यापही काहीच हालचाली होत नसल्याची चर्चा आहे.

सोलापुरातील विमानसेवा सुरळीत होण्यासाठी एक नव्हे तर तब्बल 18 प्रकारचे अडथळे असल्याचे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यात श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीसह एनटीपीसीची चिमणी, विमानतळ परिसरातील इमारतींचा समावेश आहे. श्री सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी कारखान्यापासून पाच किलोमीटर लांब हालवावी, असे विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले; मात्र ते शक्‍य नसल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे विमानसेवेतील अडथळ्यांची शर्यत कधी संपणार आणि विमानसेवा कधीपर्यंत सुरळीत होणार, याबाबत कोणीही स्पष्टपणे सांगत नाही. 

बोरामणी विमानतळासाठी आतापर्यंत 549 हेक्‍टर जमिनीचे संपादन होऊन शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला आहे. आता आणखी 34 हेक्‍टर जमीन संपादन करण्याची गरज आहे; मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मागील काही वर्षांपासून त्या जमिनीचे संपादन होऊ शकले नाही. विमानतळ विकास प्राधिकरणाकडून त्या जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव आमच्याकडे येणे अपेक्षित आहे. परंतु, अद्यापपर्यंत असा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. 
- ज्योती पाटील, प्रांताधिकारी

बोरामणी विमानतळासाठी आवश्‍यक 34 हेक्‍टरच्या भूसंपादनासाठी 33 कोटींचा प्रस्ताव प्राधिकरणामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे. परंतु, त्याचा शासनाकडून अद्यापही निर्णय झालेला नाही. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई शक्‍य आहे. 
सज्जन निचळ, व्यवस्थापक, बोरामणी विमानतळ

Web Title: more wait for getting smooth airline services in solapur