पोटच्या मुलाला मारलं, आत्महत्येचं धाडस नाही उरलं 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

सांगली : पोटच्या पोराला पाण्यात बुडवून मारणाऱ्या आईला कुणीही निर्दयीच ठरवेल. तिला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करेल, मात्र आसंगी (ता. जत) येथील स्वतःच्या मुलाच्या रक्ताने हात माखलेल्या आईची कहाणी मात्र चटका लावणारी आहे. 

सांगली : पोटच्या पोराला पाण्यात बुडवून मारणाऱ्या आईला कुणीही निर्दयीच ठरवेल. तिला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करेल, मात्र आसंगी (ता. जत) येथील स्वतःच्या मुलाच्या रक्ताने हात माखलेल्या आईची कहाणी मात्र चटका लावणारी आहे. 

एका असाध्य आजाराने गाठल्याचे समजताच ती कोलमडून पडली. आता संपलं सारं, जगायचं कशासाठी? मी तर मरणारच आहे, माझ्या मागं माझ्या मुलाची वाताहत नको, या विचाराने तिने त्याला बादलीत बुडवून मारलं आणि पुढच्या क्षणाला विहिरीत उडी घेतली. पण, पाण्यात गटांगळ्या खाताना मात्र स्वतःला संपवण्याचं तिचं धाडस झालं नाही. तिची जगण्याची धडपड सुरू झाली. ती जगली. आधीच एका असाध्य आजाराचं ओझं तिच्या मानगुटीवर होतं, आता त्यात पोटच्या पोराचा जीव घेतल्याचं पातक घेऊन ती विहिरीतून वर आली. कायद्याच्या लेखी ती एक खुनी आहे, पण स्वतःसाठी ती त्याहून मोठी अपराधी ठरलीय. 

उमदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसंगी येथील बावीस वर्षीय महिलेबाबत ही घटना घडली आहे. ती गर्भवती असताना वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यात तिला असाध्य आजाराची माहिती मिळाली. काही दिवसांनी बाळाला जन्म दिला, मात्र ती खचली होती. हे संपवलं पाहिजे, असं तिला वाटत होतं. दोन दिवसांपूर्वी रात्री ती घरातून एक महिन्याच्या बाळासह बाहेर पडली. घरापासून काही अंतरावरील विहिरीवर बाळाला बादलीत बुडवून मारले. त्याला तेथेच ठेवले आणि स्वतः विहिरीत उडी घेतली. नाकातोंडात पाणी जाताना मात्र ती भानावर आली. ती विहिरीतील मोटारीच्या पाईपला धरून थांबली, सकाळी शेतमालकाच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने तिला वर काढण्यात आले. या घटनेने साऱ्यांना सुन्न केलं आहे. तिला दोषी मानायचं की नियतीला... कायदा काही सांगू, तिला कायद्याहून मोठी शिक्षा मिळाली आहे. कदाचित, औषधे घेऊन ती असाध्य रोगाशी लढेल, मात्र पोटच्या पोराला मारल्याचं ओझं कुठं उतरवणार?

हे यंत्रणेचं अपयश? 
संबंधित महिलेला असाध्य आजार झाल्याची माहिती वैद्यकीय तपासणीनंतरच मिळाली. त्यानंतर संबंधित वैद्यकीय यंत्रणेची जबाबदारी त्या महिलेला समुपदेशनातून आधार देण्याची होती. या आजाराचे निदान झाल्यावर तिची अवस्था काय होईल, तिला मानसिक भक्कम करायला हवे होते. खरी गरज त्या क्षणाला होती. तो क्षण हातचा सुटला अन्‌ तिने आतताई निर्णय घेतला.

Web Title: Mother killed her own child and try to suicide