अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या सासूचा खून; सुनेसह प्रियकर ताब्यात

अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या सासूचा खून; सुनेसह प्रियकर ताब्यात

गडहिंग्लज/नूल - अनैतिक संबंधाचे बिंग फुटू नये म्हणून सुनेनेच प्रियकराच्या मदतीने सासूचा काटा काढल्याची घटना गडहिंग्लज तालुक्‍यातील हलकर्णी येथे घडली. अनैतिक संबंधाच्या प्रत्यक्षदर्शी ठरलेल्या सासूच्या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने मारून या दोघांनी तिचा खून केल्याच्या संशयाने सुनेसह प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता. 22) मध्यरात्री घडलेली घटना आज पहाटे उघडकीला आली. 

श्रीमती बसव्वा मलाप्पा पाटील (60) असे मृत महिलेचे नाव आहे. सून मालाश्री संतोष पाटील (वय 24) व तिचा प्रियकर रूपेश लब्यागोळ (वय 24, दोघेही रा. हलकर्णी) अशी संशयीतांची नावे आहेत. दोघांनीही घटनेची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संतोष पाटील हे मालवाहतुकीचा व्यवसाय करतात. हलकर्णी - खानापूर रोडवर त्यांचे घर आहे. आई बसव्वा, पत्नी मालाश्री व दोन मुलांसह संतोष राहतो. मालाश्री गडहिंग्लजमधील एका महाविद्यालयात बीए भाग-1 मध्ये शिकते. प्रत्येक शनिवारी ती शिक्षणासाठी गडहिंग्लजला येते. तिच्या चारित्र्याबद्दल संतोषला शंका होती. ती सतत फोनवरून बोलत असल्याने शंकेत अधिकच भर पडत होती. त्याच्या चौकशीत गल्लीतीलच रूपेश लब्यागोळ व मालाश्रीचे प्रेमसंबंध असल्याची खात्री पटल्यानंतर दोघांनाही संतोष व आई बसव्वाने दोनवेळा ताकीद केली होती. परंतु, त्यांचें संबंध कायम होते. 

दरम्यान, रविवारी बसर्गेतील पिंटू गवळी यांची गाय तंगेहाळ (ता. अथणी) येथे सोडण्यासाठी संतोष टेंपो घेवून गेला होता. रात्री उशिर झाल्याने त्याने अथणी येथेच मुक्काम केला. संतोष घरी नसल्याचे पाहून मालाश्रीने प्रियकर रूपेशला घरी बोलावले. रात्रीच या दोघांना बसव्वाने रंगेहाथ पकडले. त्यावेळी बसव्वाने तुझ्या नवऱ्याला हा प्रकार सांगते असे म्हणताच तिच्याशी मालाश्री व रूपेशने वाद घातला. आपल्यातील अनैतिक संबधाचे बिंग बसव्वाकडून बाहेर पडणार या भितीने दोघांनीही घरातील लाकडी दांडक्‍याने बसव्वाच्या डोकीत मारले. हा घाव वर्मी लागल्याने बसव्वाच्या डोकीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून ती जागीच ठार झाली. 

आज पहाटे साडेसहाच्या सुमारास खून झाल्याचे उघडकीस आले. लकाप्पा बसर्गी याने संतोष याला मोबाईलवरून तुझ्या पत्नीला बरे वाटत नसल्याने तू लवकर ये असा निरोप दिला. पोलिसांनीही असाच संदेश त्याला दिला. त्यानंतर आज सकाळी दहा वाजता संतोष घराकडे आल्यानंतर खुनाची फिर्याद संतोषने दिली व मालाश्री, रूपेशवर संशय व्यक्त केला.

घटनेची माहिती समजताच हलकर्णीसह पंचक्रोशीतील बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधीक्षक अंगद जाधवर यांनी भेट देवून तपासाबद्दल पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना मार्गदर्शन केले.

घटनेचा पंचनामा करून पहिल्यांदा सूनेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मालाश्रीकडून अधिक चौकशीत रूपेशचे नाव निष्पन्न झाल्याने दुपारी त्याला पोलिसांनी पकडले.

मालाश्रीचा बनाव अन्‌ खुनाचा छडा
घटना घडल्याचे कळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. चेहऱ्याला मास्क घालून दोन अनोळखी इसम घरी आले. माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून बसव्वाला ठार मारल्याचे मालाश्रीने पोलिसांना सांगितले. अतिप्रसंग आणि खूनाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी तत्काळ कायदा - सुव्यवस्थेची खबरदारी घेतली. गडहिंग्लज, आजरा व चंदगडमधील अधिकारी व पोलिसांना पाचारण केले. अधीक्षक डॉ. देशमुख, अतिरिक्त अधीक्षक श्री. घाडगे, उपअधीक्षक श्री. जाधवर यांनाही तातडीने घटनास्थळी भेट द्यावी लागली.

दरम्यान, खानापूरजवळील टोलनाका आणि हलकर्णीतील एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात असे मास्क घातलेले कोणीही हलकर्णीत प्रवेश केल्याचे आढळले नाही. त्यामुळे मालाश्रीने हा बनावच केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत शांत डोक्‍याने तपास करून काही तासातच या खुनाचा छडा लावला. 

मोबाईल - सीमकार्ड अज्ञातस्थळी ?
दरम्यान, हे कृत्य केल्यानंतर संशयीत रूपेशने स्वत: व मालाश्रीचा मोबाईल, त्यातील सीमकार्ड अज्ञातस्थळी टाकल्याचे सांगितले जाते. मोबाईलवरील चॅटींग व कॉल कोणाला समजू नये यासाठी त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com