Mother's Day : आईमुळेच आयुष्य कृतार्थ

Mother's Day : आईमुळेच आयुष्य कृतार्थ

संजय  डी. पाटील यांची शिक्षण क्षेत्रात आणि सतेज पाटील यांची राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख. परंतु, त्यांची जडणघडण कधी प्रतिकूल, कधी अनुकूल, तर कधी संघर्षाच्या परिस्थितीला तोंड देत होत गेली. या जडणघडणीत त्यांच्या आई शांतादेवी पाटील यांचा वाटा खूप मोठा. आज सामाजिक, राजकीय स्तरावर सतेज - संजय हीच नावे दिसत असली तरी पडद्याआड राहून आई शांतादेवींनी या दोघा मुलांना आणि मुली जया, मंगल, राजश्री यांना लहानपणापासूनच एक दिशा दिली.

डी. वाय. पाटील यांचा राजकीय व्याप, त्यावेळची जेमतेम परिस्थिती या पार्श्‍वभूमीवर त्यांनी शिक्षित, तर कुटुंबाची प्रगती निश्‍चित ही विचारधारा जपली. मुलांच्या शिक्षणावर लक्ष दिले. त्या काळात राजकीय संघर्षातून कुटुंबाला होणारा मनस्ताप मुलांपर्यंत पोचू नये, यासाठी त्यांनी आपल्या मायेचे कवच मुलांभोवती अभेद्य ठेवले. 

डी. वाय. दादांचा संघर्षाचा काळ, शिक्षण संस्थांवर आलेले अरिष्ठाचे प्रसंग, यात कोणतेही कुटुंब नक्की कोलमडून पडले असते; पण घरातली स्त्री खंबीर असली तर घराचा पाया भक्कम राहू शकतो, हे शांतादेवींनी त्यांच्या नित्य वागण्यातून दाखवून दिले. काळाच्या ओघात वाईट दिवस धुक्‍यासारखे निघून गेले आणि संजय व सतेज या दोन मुलांचे कर्तृत्व आकार घेऊ लागले. संजयने शिक्षण संस्थांत स्थिरता आणली आणि सतेज पाटलांनी आमदारकीचीच झेप घेतली. पुढे तर राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. राजभवनात राज्यमंत्री म्हणून सतेज पाटील शपथ घेत असताना ही माऊली समोर हजर होती. आनंदाश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी पोराचे कौतुक पहात होती. 

सतेज यांचा राजकारणातील रोजचा नवा संघर्ष पाहून ‘‘जपून रे बाबा..’’ असा सल्ला शांतादेवी द्यायच्या. एका माजी मंत्र्याची, एका शिक्षण संस्थाचालकाची ही आई सकाळी सहा वाजता स्वतः चहा बनवतात आणि विशेष बाब ही की, हा चहा ती स्वतः बंगल्यातल्या वॉचमन, गेटमनला देतात. पिछाडीस लावलेल्या भाजीच्या वाफ्यांना पाणी देते. ताजी ताजी भाजी खुडतात.

शांतादेवी यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले. जास्त धावपळ करू नको, असे सतेज व संजय रोज सांगतात; पण ही माऊली दिवसभर तिच्या व्यापात असते. रोज सकाळी बाहेर पडताना सतेज व संजय जेव्हा तिला न चुकता नमस्कार करतात, तेव्हा ती खूप समाधानात असते आणि आपल्या मुलाच्या पाठमोऱ्या चेहऱ्याकडे बघत आयुष्य कृतार्थ झाल्याचीच भावना या माऊलीच्या चेहऱ्यावर व्यक्त होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com