esakal | Women's Day : चिलीपिली जगवली...देशसेवेसाठी अर्पिली...
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Day : चिलीपिली जगवली...देशसेवेसाठी अर्पिली...

ऐन उमेदीच्या काळात पंचवीशीतच बबिता यांच्या पतीस अपघाती मृत्यूने कवटाळले. होत्याचे नव्हते झाले. दु:खाचा डोंगर कोसळला. चिलीपिली पोर निराधार झाली. मात्र, खचून न जाता बबिता यांनी जगण्याची लढाई सुरू केली.

Women's Day : चिलीपिली जगवली...देशसेवेसाठी अर्पिली...

sakal_logo
By
संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : ऐन उमेदीत पतीला अपघाती मृत्यूने कवटाळले. मात्र, खचून न जाता तिने प्रतिकूल परिस्थितीचा धीरोदात्तपणे सामना केला. अपार कष्ट उपसत चार चिल्यापिल्यांना जगवले. आडाणी असूनही त्यांना शिकवले. तिघे जण देशसेवेत रुजू झाले. त्यामुळे जगण्याची लढाई जिंकल्याचे "तेज' आज त्या माऊलीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. 
अपार कष्ट, चिकाटी अन्‌ जिद्दीच्या जोरावर जगण्याची लढाई जिंकणारी ती माऊली आहे. धोंडेवाडीतील (ता. खटाव) येथील बबिता आकाराम घाडगे.

गुरसाळे हे माहेर सोडून लग्नानंतर त्या धोंडेवाडीला आल्या. मालक हिऱ्यांच्या कारखान्यात कामाला जात होते. चांगला सुखी संसार सुरू होता. मात्र, त्या संसाराला पाच- सहा वर्षांतच दृष्ट लागली. कामाला जातानाच मायणीच्या चांदणी चौकात मालकावर काळाने झडप घातली. ऐन उमेदीच्या काळात पंचवीशीतच त्यांना अपघाती मृत्यूने कवटाळले. होत्याचे नव्हते झाले. दु:खाचा डोंगर कोसळला. चिलीपिली पोर निराधार झाली. मात्र, खचून न जाता जगण्याची लढाई सुरू केली. वृद्ध सासूसासऱ्यांनी धीर दिला. कष्ट उपसले. रोजंदारीवर अनेकांचे बांध झिजवले. मिळेल ते काम केले. फाटलेल्या संसाराला टाके मारण्यासाठी गुरेढोरे पाळली. मात्र, 2003 च्या भीषण दुष्काळात सारंच वाया गेले, तरीही जिद्द सोडली नाही. चिलीपिली पोरे अंगाखांद्यावर घेऊन दुष्काळात खड्ड्यांची, माती मुरमाची कामे केली. स्वत: आडाणी असूनही मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. थोरली मुलगी सुवर्णा रोजच आईची जगण्यासाठीची लढाई पाहात होती. त्यामुळे शिकून नोकरी करायची. आईला चार पैशाची मदत करायची. या जिद्दीने तिची धडपड सुरू होती. आईबरोबर कामे करून सुवर्णा बारावी झाली. मुंबई पोलिसात ती भरतीही झाली. साऱ्या कुटुंबाला आभाळ ठेंगण झाले. घराला आनंदाचे भरते आले. आईला आर्थिक मदत होऊ लागली. मग दुसरी मुलगी दीपालीही पुढे शिकत बीकॉम झाली. मुलांना प्रेरणा मिळाली. सहा महिन्यांपूर्वीच एक मुलगा तात्याबा लष्करात दाखल झाला आहे. तो टेक्‍निकल विभागात काम करत आहे.

दुसरा मुलगा समाधानचीही नुकतीच इंडियन नेव्हीत निवड झाली आहे. आता बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य आले आहे. मात्र, अजूनही पडद्याचे पार्टीशन असलेल्या जुन्या एकाच खोलीच्या घरात त्या मुलांसह राहात आहेत. मोठ्या कष्टाने व जिद्दीने उभा केलेला संसार असाच फुलावा. मुलांनी प्रामाणिकपणे व सत्याच्या मार्गाने देशाची चांगली सेवा करावी. नाव कमवावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा :  Womens Day भरकटलेल्या मुलींना पाेलिसांनी दिली उर्जा