अल्पवयीन चोरट्यांनी मोटरसायकल चोरीसह ट्रक चालकांना लुटले

हेमंत पवार
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

अल्पवयीन चोरट्यांनी मोटरसायकल चोरीसह ट्रक चालकांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अल्पवयीन तीन चोरट्यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी आत्तापर्यंत सहा मोटरसायकलची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी सांगितले. 

कऱ्हाड- अल्पवयीन चोरट्यांनी मोटरसायकल चोरीसह ट्रक चालकांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अल्पवयीन तीन चोरट्यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी आत्तापर्यंत सहा मोटरसायकलची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी सांगितले. 

पोलिसांची माहिती अशी की, अल्पवयीन तीन चोरट्यांनी चोरी, दरोडे या सारख्या घटना करून धुमाकूळ घातला आहे. परिसरातील एका महिलेची रिक्षा भाड्याने चालवण्यासाठी घेऊन हे चोरटे त्या रिक्षाचा वापर चोरीसाठी करत आहेत. चोरटे रात्रीच्या वेळी रिक्षातून पुणे-बंगळूर महामार्गावर फिरुन ट्रकचालकांना लुटत होते. त्याचबरोबर रस्त्यालगत पार्क केलेली दुचाकी किंवा घराच्या समोर लावलेली दुचाकी ते चोरून नेत होते.

अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलीसही चक्रावले होते. अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन हे चोरटे नेहमीच चोरीचा उद्योग करत होते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, पाचवड फाटा, रेठरे बुद्रुक, कृष्णा कारखाना, शेणोली स्टेशन परिसरातील दुचाकी त्यांनी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी याच अल्पवयीन चोरट्यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर ट्रक चालकाला लुटले होते. त्यावेळीही त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

मात्र, अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर पुढील गंभीर स्वरूपाची कारवाई झाली नाही. पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर या अल्पवयीन चोरट्यांनी पुन्हा चोरीचे प्रकार सुरुच ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी पाचवड फाटा येथून रात्रीच्या सुमारास दुचाकी चोरून रिक्षाव्दारे ढकलत घेऊन जात असताना काही नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करताच या चोरट्यांनी चोरलेली दुचाकी तेथेच टाकून तिथून पळ काढला.

दरम्यान यावेळी त्यांनी बरोबर आणलेले रिक्षाही तेथेच सोडून दिली. त्यामुळे पोलिसांनी रिक्षाच्या आधारे चोरट्यांचा तपास करून त्यांना ताब्यात घेतले. चोरट्यांनी आत्तापर्यंत सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. आणखीही चोरीची कबुली चोरटे देतील, असे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: motorcycle theft by minor boys in karad