खासदार मंडलिक, धैर्यशिल माने यांनी घेतली मराठीतून शपथ

खासदार मंडलिक, धैर्यशिल माने यांनी घेतली मराठीतून शपथ

कोल्हापूर - देशाचे लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसदेच्या पायरीला नतमस्तक होऊन आज कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत प्रवेश केला. या दोघांनी मराठीतून शपथ घेत मराठी बाणा संसदेत जपला. दोघांच्याही शपथविधीनंतर  ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा देऊन मराठी खासदारांनी सभागृह दणाणून सोडले. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी आज दिल्ली गाठली. आज संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाते. संसदेत प्रवेश करण्यापूर्वी प्रा. मंडलिक यांनी संसदेच्या पायरीला वाकून नमस्कार केला. त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक सुनील मोदी आहेत.

खासदार माने हे सहकुटुंब अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या आई व माजी खासदार निवेदिता माने, पत्नी वेदांतिका, भाऊ सत्त्वशील, दोन मुली, झाकीर भालदार व मतदारसंघातील काही प्रमुख कार्यकर्ते आहेत. सभागृहात माने यांनी भगवा कोल्हापुरी फेटा बांधून प्रवेश करीत सर्वांचे लक्ष वेधले. कोल्हापूरच्या दोन्हीही खासदारांनी ‘परमेश्‍वराला साक्षी ठेवून’ मराठीतूनच शपथ घेतली.

संसदेचे हंगामी अध्यक्ष व ‘बीजेडी’चे खासदार मेहताब यांनी त्यांना शपथ दिली.  या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लोकसभा चॅनेलवर सुरू होते. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास या दोघांनीही शपथ घेतली.  दोघांच्याही शपथविधी सोहळ्यानंतर सभागृह ‘जय शिवाजी, जय भवनी’ घोषणांनी दुमदुमून गेले. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन
संसदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यालाही प्रा. मंडलिक, माने यांनी अभिवादन केले. या वेळी त्यांच्याबरोबर शाहू महाराजांचे वारस व खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. संसदेच्या प्रांगणातील या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने हे उपस्थित होते. आज त्यांच्या वारसांनी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी शाहू महाराजांना अभिवादन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com