महालक्ष्मी एक्‍स्प्रेसचा वेग वाढवा - संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

कोल्हापूर - महालक्ष्मी एक्‍स्प्रेसला ५१८ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ११ तासांचा वेळ लागतो. म्हणजे गाडीचा सरासरी वेग केवळ ४७ किलोमीटर प्रतितास आहे. जो व्यवहार्य नाही. तो वेग वाढवून कमीत कमी ६० किलोमीटर प्रतितास करावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

कोल्हापूर - महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रेल्वेमुळे कोल्हापूरसहित संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र मुंबईशी जोडला आहे, परंतु आज गाडीचा प्रवास वेळ खाऊ आहे. ५१८ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ११ तासांचा वेळ लागतो. म्हणजे गाडीचा सरासरी वेग केवळ ४७ किलोमीटर प्रतितास आहे. जो व्यवहार्य नाही. तो वेग वाढवून कमीत कमी ६० किलोमीटर प्रतितास करावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कोल्हापूर-पुणे मार्गावर अतिरिक्त पॅसेंजरही सुरू करावी, अशीही मागणी केली.

महालक्ष्मी एक्‍स्प्रेसचा वेग वाढल्यास दोन ते तीन तासांची बचत होणार आहे. याचा कोल्हापूर तसेच सर्वच ठिकाणच्या प्रवाशांना लाभ होईल. या एक्‍स्प्रेसला वातानुकूलित डब्यांची संख्याही कमी आहे, त्यामुळे प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे वातानुकूलित डब्यांची संख्याही वाढवावी, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे. 

कोल्हापूर-पुणे मार्गावरील प्रवासी संख्येतही दिवसेदिवस वाढ होत आहे. पण यासाठी सोयीची रेल्वे नसल्याने अनेकांना रस्त्यानेच प्रवास करावा लागतो. सध्या असलेली पॅसेंजर रेल्वेला ३१८ किलोमीटरसाठी आठ तासांचा वेळ लागतो. मुंबई-पुणे मार्गावरील शताब्दी एक्‍स्प्रेस कोल्हापूरपर्यंत आणल्यास हे अंतर चार तासांवर येईल. त्यामुळे या मार्गावर जलद पॅसेंजर रेल्वे सुरू करावी किंवा शताब्दी एक्‍स्प्रेस कोल्हापूरपर्यंत सोडावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नवीन सरकारचा कामाचा आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी संभाजीराजेंनी मागण्यांचा धडाका लावला यावर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मकता दाखवत अधिकाऱ्यांना तत्काळ निर्देश दिले. कोल्हापूर आणि परिसरातील रेल्वेसंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर माझे मंत्रालय सकारत्मक असेल, अशी ग्वाही त्यांनी संभाजीराजेंना दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhajiraje Chhatrapati demand