कोल्हापूर राष्ट्रवादीचा नव्हे शिवसेनेचा बालेकिल्ला - मंडलिक

कोल्हापूर राष्ट्रवादीचा नव्हे शिवसेनेचा बालेकिल्ला - मंडलिक

गडहिंग्लज - ""लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेला नको असलेला उमेदवार लादला. ध्यानात ठेवण्याची धमकीवजा भाषा वापरली. ध्यानातच ठेवायचे होते, तर त्यांनी 2009 चा पराभव लक्षात ठेवायला हवा होता. जिल्हा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही, तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे, हे जरूर ध्यानात ठेवावे'', असे प्रतिपादन

खासदार संजय मंडलिक यांनी केले. शिवेसना-भाजप महायुतीच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपालिकेच्या शाहू सभागृहात हा मेळावा झाला. 

श्री. मंडलिक म्हणाले, ""देशातील हा एकमेव मतदारसंघ होता, जिथे अर्ज भरण्याआधीच निकाल लागला. लोकसभा निवडणूक मी जिंकलेली नाही, तर कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने जिंकली आहे. कारण प्रत्येकाने उमेदवार म्हणून काम केले. माझ्या विजयात गडहिंग्लज विभागाने मोठी भूमिका पार पाडली आहे. वर्षांनुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे काम करावे लागणार आहे. पाणी आणि उद्योगधंद्यांचा प्रश्‍न प्रामुख्याने हाती घेणार आहे. या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी संघटित ताकद उभारावी लागणार आहे.'' 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी स्वागत केले. श्री. देवणे, गोडसाखरचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर, पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर गुरबे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुनील शिंत्रे, संघटक संग्रामसिंह कुपेकर, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, भैरू पाटील, सोमगोंडा आरबोळे यांची भाषणे झाली. विरेंद्र मंडलिक, राजेश पाटील, रियाज शमनजी, अनिरुद्ध रेडेकर, शिवाजी कांबळे, गणपतराव डोंगरे, अनुप पाटील आदी उपस्थित होते. 

चर्चा विधानसभेची... 
लोकसभा निवडणुकीतील विजयाचा आभार मेळावा असला, तरी विधानसभा निवडणुकीची अधिक चर्चा झाली. चंदगड मतदारसंघातील इच्छुक संग्रामसिंह कुपेकर व प्रा. सुनील शिंत्रे यांनी थेट मुद्दा उपस्थित करीत निवडणुकीची जबाबदारी घेण्याचे आवाहन श्री. मंडलिक यांना केले. प्रकाश चव्हाण यांनी याच मुद्द्यावरून इच्छुकांचा चिमटा काढला. देवणे यांनी चंदगडमध्ये शिवसेनेचाच आमदार होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. श्री. मंडलिक यांनी भाषणाच्या सुरवातीला सर्वच इच्छुकांचा भावी आमदार असा उल्लेख केला. मात्र, महायुती देईल तो उमेदवार या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करीत या चर्चेचा शेवट केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com