खासदार सुप्रिया सुळेंची उदयनराजेंवर खाेचक टीका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 January 2020

खंडाळा तालुका मराठी पत्रकार संघ आणि खंडाळा पंचायत समिती यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार साम टी.व्हीचे संपादक निलेश खरे तसेच जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शरद काटकर यांना 'जीवन गौरव पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या गुणवंतांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कारण्यात आला.
 

लोणंद  (जि. सातारा) : सातारा लोकसभेचे प्रतिनिधी बदलल्याने माझी अडचण झाली आहे. कारण पूर्वीचे लोकसभेचे प्रतिनिधी विकास निधीसाठी कधीच आग्रह धरत नव्हते, त्यामुळे तो निधीही मलाच मिळत होता. मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी श्रीनिवास पाटील साहेब हे सर्व माहिती असणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे पूर्वीसारखा आता निधी मला मिळणार नाही, आशी खोचक टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांच्यावर खंडाळा येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात केली.

खंडाळा तालुका मराठी पत्रकार संघ व खंडाळा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा येथे पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार दिन,राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण तसेच गुणवंत कर्मचारी यांचा सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.

हेही वाचा - एसटी पलटी... किंकाळ्‍यांनी चुकला हृदयाचा ठोका

सुळे म्हणाल्या, वर्तमानपत्र वाचन ही आपली संस्कृती आहे. भाषा सुधारण्यासाठी वर्तमानपत्र वाचन गरजेचे आहे. पत्रकारांनी मनमोकळे काम करावे. महिलांना व इतर क्षेत्रात न्याय मिळण्यासाठी समानता आणली पाहिजे. पत्रकार व नेते हे नात काही वेळा  अडचणीचे ठरते. सातारा जिल्हा हे पवार साहेबांचे टॉनिक आहे. महाराष्ट्राच्या जनतेने पवार साहेबांवर भरभरून प्रेम केले. या प्रेमाच्या नात्याला, विश्वासाला तडा जाता कामा नये.

यशवंतराव चव्हाण साहेबांचे आपल्या सर्वांवर संस्कार आहेत. आपले महाआघाडीचे सरकार नवीन ऊर्जेनं , विश्वासाने राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करेल. महिला, अंगणवाडी सेविका, आशा ताई, बचतगट यांचे सगळे प्रश्न प्राधान्य देवून सोडविले जातील.

यावेळी सामचे संपादक निलेश खरे म्हणाले, दर्पण नावातच पत्रकारिता कशी असावी हे दिसते. आजकाल पत्रकार 'दीन ' म्हणून जगतोय. मात्र व्यवस्थापन व सहकाऱ्यांचा पाठींबा असेल तर पत्रकार मनमोकळे -पणाने काम करु शकतो.

जरुर वाचा -  हे केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

कार्यक्रमास आमदार मकरंद पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, माजी कृषी सभापती मनोज पवार,सदस्या दिपाली साळुंखे, उपसभापती वंदनाताई धायगुडे -पाटील, खंडाळा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव, तहसिलदार दशरथ काळे,गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, गटशिक्षण अधिकारी गजानन आडे, विनोद कुलकर्णी,अजय भोसले आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule Indirectly Criticizes Udayanraje Bhosale