खासदार उदयनराजे भोसले मित्र परिवारातर्फे हुतात्मांना श्रध्दांजली कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुलवामा हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व जिल्ह्यातील आज अखेर धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांचा लष्करी इतमानाने सन्मान होणार आहे.

कऱ्हाड : पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कऱ्हाड येथे ज्येष्ठ नेते व माजी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात रविवारी (ता. 24) सायंकाळी सहा वाजता श्रद्धांजली वाहन्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हुतात्मा जवानांच्या परिवारांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले मित्र परिवारातर्फे माजी उपाध्यक्ष व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव, सुनील काटकर व संग्राम बर्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. यादव म्हणाले, 'सातारा जिल्ह्यातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांबद्दल व पुलवामा दुर्घटनेतील हुतात्मांबद्दल सहवेदना व्यक्त करण्यात येणार आहे. पुलवामा हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व जिल्ह्यातील आज अखेर धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांचा लष्करी इतमानाने सन्मान होणार आहे. त्यातून सीमेवर तैनात जवानांसह व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, हाच संदेश द्यायचा आहे. कार्यक्रम सर्वपक्षीय असणार आहे. खासदार भोसले मित्र परिवाराने त्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, क्रीडा, शैक्षणिक व आर्थिक संस्था, व्यापारी संस्था, डॉक्टर, इंजिनिअर, मेडिकल व बार असोशिएशन, गणेश व दुर्गोत्सव मंडळे, रिक्षा संघटना, समाजातील अन्य घटक सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी, माजी सैनिक संघटनांना विशेष निमंत्रित केले आहे. कऱ्हाड व सातारा येथील महाविद्यालयातील एनसीसीचे कॅडेट व शालेय विद्यार्थ्याचा सहभाग आहे. यानिमित्ताने लष्कर व पोलिस बॅन्ड पथकेही उपस्थित राहणार आहेत. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर 'जागो हिंदुस्थानी' कार्यक्रम होणार आहे.'

 

Web Title: MP Udayan Raje Bhosale suppoters organized a tribute program for the martyrs