वनसेवा परीक्षेत लक्ष्मण कसेकर राज्यात प्रथम

संदीप खांडेकर
शुक्रवार, 24 मे 2019

एक नजर

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम. 
  • नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे महिला गटात राज्यात प्रथम. 

कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

आयोगातर्फे सहाय्यक वनसंरक्षक गट - अ च्या १६, वनक्षेत्रपाल गट - ब च्चा ५३ अशा एकूण ६९ पदांसाठी परीक्षा झाली होती. पूर्व परीक्षा २८ ऑक्टोबर २०१८, तर मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर २०१८ ला मुंबई केंद्रावर झाली. लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीसाठी २२१ उमेदवार पात्र ठरले होते. त्यांच्या चार ते बारा एप्रिल २०१९ दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या.

परीक्षेत आजरा तालुक्यातील लक्ष्मण कसेकर उत्तीर्ण झाला. त्याच्या यशाची बातमी मित्रपरिवाराला कळताच त्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्याचे शालेय शिक्षण विद्यामंदिर देवर्डे येथून झाल्यानंतर त्याने आजरा महाविद्यालयातून बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले. त्याने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. त्याने तीन वर्षांपूर्वी अभ्यासास सुरुवात केली होती. त्यासाठी तो पुण्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात दाखल झाला होता.

तेथे त्याने सुरुवातीला यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. त्यानंतर वनसेवेची परीक्षा दिली. मात्र, मुख्य परीक्षेत पात्र होऊनही त्याला मुलाखतीचा कॉल आला नव्हता. त्याने अभ्यास सुरूच ठेवला. विशेष म्हणजे मार्च २०१९ ला जाहीर झालेल्या निकालात त्याने सहाय्यक कक्ष अधिकारीपदाच्या परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावला. त्याचा भाऊ रामचंद्र टॅक्स असिस्टंट परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. त्याची आई शोभा व वडील महादेव हे शेतकरी आहेत.  त्याने मुलाखतीची तयारी कोल्हापुरातील ए. बी. फाऊंडेशनमधून केल्याचे त्याने सांगितले.

दररोज सात ते आठ तास अभ्यास करत होतो पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही म्हणून थांबलो नाही अभ्यास करतच राहिलो सातत्यपूर्ण अभ्यास हे माझ्या यशाचे गमक ठरले आहे.
- लक्ष्मण कसेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC Forest service Exam result Laxman Ksekar first in state