चिखल हटवत वाहनांना मिळतेय वाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

ढेबेवाडी - पाटीलवाडी, नेहरू टेकडी व परिसरातील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात दैना झाली. प्रचंड दलदल निर्माण झाल्याने ग्रामस्थांना चिखल हटवत वाहनांना मोकळी वाट करून द्यावी लागत आहे. वाहनचालकांकडून सुरू असलेल्या या कसरतीमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. 

वाल्मीक पठारावरील रूवले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या वाड्या-वस्त्यांना स्वातंत्र्योत्तर काळात बारमाही वाहतूकयोग्य रस्ता मिळालेला नाही. फाटा ते पाटीलवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, नंतर डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने टाकलेली खडीही उखडली आहे. 

नेहरू टेकडीपासून पुढे ८०० मीटरच्या रस्त्याचेही मध्यंतरी डांबरीकरण करण्यात आले. पुढच्या रस्त्याचा पत्ता नाही. अति पावसाचा हा परिसर असल्याने नाल्यांअभावी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या मार्गावर एसटीची वाहतूक नाही, वडाप किंवा पायपीट एवढे दोनच पर्याय ग्रामस्थांपुढे असून दलदलीमुळे दोन्ही पर्याय गुंडाळल्यासारखी स्थिती आहे. अक्षरशः चिखल हटवत वाहने गावापर्यंत पोचवावी लागत आहेत. कसरत करत निघालेली वाहने आणि समोर हातात खोरे घेऊन रस्त्यावरील चिखल हटविण्यासाठी धडपडणारे ग्रामस्थ असे चित्र दृष्टीस पडत आहे. 

बारमाही वाहतूकयोग्य रस्ता न मिळाल्यास अगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असला तरी अद्याप तरी त्याची दखल कुणी घेतलेली दिसत नाही.

स्थानिकांची पायपीट ठरलेलीच..!
नेहरू टेकडी, पाटीलवाडी परिसरातील वाहतूक पावसाळ्यात पूर्णपणे बंद पडत असल्याने आजारी व्यक्तीला पाळणा किंवा डोलीतून, खांद्यावरून डोंगरपायथ्यापर्यंत उचलून आणावे लागते. यंदा पहिल्याच पावसात रस्त्याची दैना झाल्याने वनवास लवकर सुरू झाल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. शिक्षणासाठी रूवलेत पायपीट करीत जाणारे विद्यार्थीही सध्या शेतातून चिखल तुडवत ये-जा करत आहेत.

Web Title: mud by rain road vehicle