तंबुतील थिएटर झाले मल्टिप्लेक्‍स ; नव्या वर्षात राज्यभर उभारणी

तंबुतील थिएटर झाले मल्टिप्लेक्‍स ; नव्या वर्षात राज्यभर उभारणी

वडूज  : "मल्टिप्लेक्‍स'च्या जमान्यात ग्रामीण भागांतील लोकांचे मनोरंजनाचे प्रमुख साधन असणारी ग्रामीण चित्रपटगृहे जवळपास लुप्त झाली आहेत. मात्र, येथील युवा सिनेव्यावसायिक अनुप अशोकराव जगदाळे यांनी ग्रामीण चित्रपटगृहांना आता "मल्टिप्लेक्‍स'चे स्वरूप देऊन त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील "सिनेमावाले' ग्रुपच्या माध्यमातून येथे असे मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृह सुरू करण्यात आले असून, लवकरच राज्यात 100 ठिकाणी अशी फिरती मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहे सुरू केली जाणार आहेत. 


श्री. जगदाळे यांचे आजोबा (कै.) बापूराव जगदाळे (पंत) त्यांचे चिरंजीव (कै.) अशोकराव जगदाळे यांनी अनुप टॉकीजच्या माध्यमातून 50 वर्षांहून अधिक काळ हा सिने व्यवसाय सांभाळला. येथे कायमस्वरूपी चित्रपटगृह चालविण्याबरोबर जिल्ह्या परजिल्ह्यांतील गावोगावच्या यात्रा जत्रांतून त्यांनी लोकांना चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजाची उपलब्धता करून दिली. 2010 पर्यंत त्यांचा हा सिनेव्यवसाय सुरू होता. मात्र, बदलत्या काळात दूरचित्रवाणी, मोबाईल, इंटरनेट अशी मनोरंजनाची अत्याधुनिक साधने लोकांच्या हातात आली. त्यामुळे ग्रामीण भागांतील सिनेव्यवसाय काळाच्या ओघात लुप्त झाला. मोठमोठ्या शहरांत, मॉलच्या ठिकाणी वातानुकूलित, खाद्य पदार्थांची रेलचेल, तसेच सर्व सोयीसुविधा असणारी मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहे उदयास आली. आर्थिक सक्षम असणाऱ्या वर्गाला हे मल्टिप्लेक्‍स थिएटर खिशाला परवडते. मात्र, ग्रामीण भागांतील लोकांचे हक्काचे मनोरंजनाचे साधन मात्र दुरावले. 


ग्रामीण भागांतील लोकांना मनोरंजनासाठी त्यांचे चित्रपटगृह पुन्हा सुरू व्हावे, लोकांची बदलती लाइफस्टाइल, तसेच बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन "मल्टिप्लेक्‍स'च्या धर्तीवर वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसन व्यवस्था, कारपेट, कार्पोरेट लुक, कर्णमधूर आवाज, चांगली पिक्‍चर क्वॉलिटी, चित्रपटांचे उत्कृष्ट व उच्च दर्जाचे सादरीकरण पाहता यावे, यासाठी येथील युवा सिनेव्यावसायिक अनुप जगदाळे यांनी पुढाकार घेतला आहे. 


अनुप जगदाळे यांनी आजोबांसह वडिलांबरोबर लहानपणापासून सिने व्यवसायात काम केले आहे. सिनेव्यवसायात त्यांनी चित्रपटांचे प्रदर्शन, वितरण, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात स्वत:चा वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे. श्री. जगदाळे यांनी दिग्दर्शित केलेल्या "झाला बोभाटा' या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यांचा भिरकिट आणि बेभान हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होत आहे. 


या व्यवसायातील विविध क्षेत्रांतील अनुभवांची शिदोरी व सिने क्षेत्रातील बदलते स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी या क्षेत्रातील आपल्या काही सहकाऱ्यांसह "सिनेमावाले' ही संस्था सुरू केली. "सिनेमा तुमच्या दारी' हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ज्या ठिकाणी चित्रपटगृह उपलब्ध नाहीत विशेषत: काही शहरी, निमशहरी व ग्रामीण भागांत "सिनेमावाले' या संस्थेच्या माध्यमातून अशी फिरती मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहे सुरू केली जाणार आहेत. या संकल्पनेची त्यांनी येथे सुरवात केली आहे. याठिकाणी मल्टिप्लेक्‍समध्ये असणाऱ्या वातानुकूलित यंत्रणा आदी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वाजवी शुल्कात लोकांना मल्टिप्लेक्‍समधील सिनेमाचा आनंद या माध्यमातून दिला जात आहे. वातानुकूलित यंत्रणेसह अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा, चित्रपटांची चांगल्या दर्जाची व डिजिटल क्वॉलिटी, स्त्रिया व पुरुषांसाठी स्वतंत्र अशी सुमारे 200 प्रेक्षकांची आसन व्यवस्था त्यामध्ये करण्यात आली आहे. याशिवाय चित्रपटाच्या तिकिटाच्या आरक्षणाची (बुकिंग) घरपोच व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली आहे. 


सिनेमावाले या संस्थेच्या माध्यमातून राज्यात सुमारे 100 ठिकाणी अशी मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहे सुरू केली जाणार आहेत. दर शुक्रवारी प्रदर्शित होणारे नवीन चित्रपट लोकांना त्याच दिवशी आपल्या गावात पाहता येतील अशी सोय करण्यात आली आहे. शिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त त्यातील कलाकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाखेरीज वर्ल्डकप, आयपीएलचे क्रिकेट सामनेही दाखविले जाणार आहेत. त्या त्या भागांतील लहान मोठ्या व्यावसायिकांसाठी या चित्रपटगृहात जाहिरातींची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com