मुंबई मटका... पण फुटतो बुलढाण्यात

सुधाकर काशीद
गुरुवार, 18 जुलै 2019

कोल्हापूर - म्हणतात मुंबई मटका; पण तो प्रत्यक्षात फुटतो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर गावात. मटका फुटतो म्हणजे काय होते? मटक्‍याचे सात-आठ सूत्रधार मटका फुटण्याआधी राज्यभरातून त्यांच्या बुकी मालकांकडून अंदाज घेतात.

कोल्हापूर - म्हणतात मुंबई मटका; पण तो प्रत्यक्षात फुटतो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर गावात. मटका फुटतो म्हणजे काय होते? मटक्‍याचे सात-आठ सूत्रधार मटका फुटण्याआधी राज्यभरातून त्यांच्या बुकी मालकांकडून अंदाज घेतात. उदाहरण सांगायचे झाले तर इचलकरंजीतून आगरवाल बंधू किंवा कोल्हापुरातून मटका सम्राट, मटका किंग हे अमूक अमूक आकड्यावर आज लोकांनी इतका पैसा लावला आहे, हे कळवतात. मग हे सूत्रधार नेमका तो आकडा वगळून ओपन आणि क्‍लोज जाहीर करतात आणि प्रत्येक १०० रुपयातले ८० रुपये मटक्‍याचे सूत्रधार मिळवतात. म्हणजेच मटका खेळणारे ८० टक्के लोक रोज आपला खिसा रिकामा करतात आणि या मटकेवाल्यांची भर करतात. 

मग विनासायास मिळणाऱ्या या पैशातून मटकेवाल्यांचा रुबाब सुरू होतो. गणेशोत्सव आला की दे लाखांची वर्गणी, मोहरम आला की दे कत्तलरात्रीच्या मिरवणुकीचा खर्च. कोणताही धार्मिक सण आला की कर महाप्रसादाचा खर्च, असा दानधर्म या मटकेवाल्यांकडून सुरू होतो. कोल्हापुरातला मटका सम्राट गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दणदणाटाचा सर्व खर्च चुटकीसरशी करतो. अर्थात, त्याला काय त्याच्या पगारातून किंवा स्वमिळकतीतून खर्च करावा लागत नाही. तो लोकांना मटक्‍याची आशा लावून त्यांना कंगाल बनवतो व लोकांच्या खिशातून काढून घेतलेला पैसाच तो दानधर्माच्या नावाखाली वाटत राहतो आणि त्यातून आपली प्रतिमा उजळ बनविण्याचा प्रयत्न करतो.

मटक्‍याच्या राज्यभरातील उलाढालीत कोल्हापूरचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मटक्‍याचा रोज रात्री ओपन क्‍लोजचा आकडा काढताना कोल्हापुरात कोणत्या आकड्यावर जास्त पैसे लागले आहेत, त्याचा प्राधान्याने विचार केला जातो. म्हणजेच कोल्हापुरात ज्या आकड्यावर जास्त लोकांनी पैसे लावले आहेत, तो आकडा न काढता दुसराच आकडा काढला जातो. कोल्हापुरात मटक्‍याचे सूत्रधार रुबाबात फिरत असतात, आपण खूप दानशूर, धार्मिक, आध्यात्मिक आहोत असे भासवत असतात; पण ते रोज असंख्य लोकांचा खिसा रिकामा करत आपली पोतडी भरत असतात. 

अधिकारी बदलल्यावर पुढे काय होणार?
कोल्हापूर पोलिसांनी काही महिन्यांत मटक्‍यावर जरूर कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबईतून किंवा मलकापूर (बुलढाणा) येथून मटका काढणाऱ्या पाच मुख्य सूत्रधारांनाही अटक केली आहे. त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे नेहमीची मोठी उलाढाल बंद आहे; पण चुटपुट मटका चोरून चालूच आहे. पोलिसांनी बऱ्यापैकी मटक्‍याची साखळी शोधून काढली आहे. आता थोडी थोडी पोलिस कारवाईबद्दल लोकांना खात्री पटू लागली आहे. पण आता आहेत हे अधिकारी बदलून गेल्यावर पुढे काय होणार, ही शंका लोक अगदी सहज व्यक्त करतात. मटक्‍याच्या हप्त्यावर पोलिस यंत्रणा कशी पोसली गेली होती, हे यापूर्वी कोल्हापूरकरांनी जवळून पाहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Matka declared in Buldhana special story